Pune Water News | पुणे शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणीकोट्याबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांतच पाणीटंचाईचा प्रश्न उभा राहू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) केवळ 15 दिवसांचा अवधी उरला असून जलसंपदा विभागाने थकबाकी तातडीने न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
933 कोटींची थकबाकी आणि वाढता वापर :
शहरासाठी 11.60 टीएमसी इतका पाणीकोटा मंजूर करण्यात आला आहे; मात्र हा साठा मर्यादित काळापुरताच शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलसंपदा विभागाकडे (Water Resources Department) महापालिकेची तब्बल 933 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. ही रक्कम त्वरीत न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मागील महिन्यात 953 कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, महापालिका दरमहा फक्त 10 कोटी रुपये पाणीपट्टी म्हणून जमा करत असल्याचे समोर आले आहे. (Pune Water News)
2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर मर्यादेपेक्षा 8.84 टीएमसी अधिक पाणी वापरल्याची नोंद आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (Maharashtra Water Resources Regulatory Authority) यांच्या नियमांनुसार मंजूर कोट्याच्या 25 टक्क्यांपर्यंत जादा वापर झाल्यास दीडपट दर आकारला जातो; तर त्याहून अधिक वापर झाल्यास तिप्पट दराने दंड आकारला जातो. त्यामुळे थकबाकी वाढत गेली असून ती निकाली न निघाल्यास पुणेकरांसमोर पाणीबंदीची वेळ येऊ शकते.
Pune Water News | उर्वरित साठा मर्यादित, शेतीवर परिणाम :
2016 पासून अतिरिक्त पाणीवापर होत असल्याचे विभागाकडून नमूद करण्यात आले आहे. एकूण 952 कोटी 62 लाख रुपयांची थकबाकी होती. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 19 कोटी 75 लाख रुपये भरल्यानंतरही फेब्रुवारीअखेर 932 कोटी 88 लाख रुपये बाकी असल्याचे सांगण्यात आले. 31 जानेवारीअखेर 11.23 टीएमसी पाणी वापरले गेले असून उर्वरित 0.36 टीएमसी साठा पुढील 12 दिवसांत संपण्याची शक्यता आहे. (Pune Water News)
खडकवासला प्रकल्पांतर्गत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख (Kiran Deshmukh) यांनी सांगितले की, मंजूर कोट्यापेक्षा जादा वापरामुळे शेतीसाठी पाणी अपुरे पडत आहे. परिणामी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी वाढत आहे. महापालिकेने तातडीने थकबाकी अदा करावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






