Pune Crime | पुण्यात पोलिसांवर हल्ल्याच्या सलग दोन घटनांनी शहर हादरले आहे. एका घटनेत फुरसुंगी (Fursungi) येथे एका दुचाकीस्वाराने पोलीस हवालदाराच्या डोक्यात दगड मारून हल्ला केला, तर दुसऱ्या घटनेत रामटेकडी (Ramtekdi) परिसरात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हल्ला केला. या दोन्ही घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune Crime)
फुरसुंगी येथे पोलीस हवालदारावर हल्ला
फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) यांनी फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला अडवले. याचा राग आल्याने त्या दुचाकीस्वाराने रस्त्यात पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर दुचाकीस्वार घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रामटेकडी येथे कोयता गँगचा पोलिसांवर हल्ला
रामटेकडी येथे कोयता गँगच्या गुंडांना अटक करण्यासाठी पोलीस गेले असता, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (Ratnadeep Gaikwad) या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
गायकवाड यांनी कोयता गँगच्या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गुंडांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime)
पुण्यात पोलिसांवर सातत्याने होत असलेले हल्ले चिंतेचा विषय ठरत आहेत. अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याने, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस प्रशासन आता या दोन्ही हल्लेखोरांचा शोध घेत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Title : Pune Crime Two Shocking Attacks on Pune Police






