Pune Crime | पुण्यातील (Pune Crime) स्वारगेट एसटी डेपोवर (Swargate ST Depot) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एका गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी घडल्याने महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बस दाखवण्याच्या बहाण्याने अमानुष कृत्य-
पीडित तरुणी पुण्यात काम करत होती आणि सोमवारी पहाटे साडेपाच ते पावणेसहा दरम्यान ती फलटणला (Phaltan) जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आली. त्यावेळी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा आरोपी तिच्या आजूबाजूला फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे.
प्रारंभी, तरुणी ज्या ठिकाणी बसली होती, तिथे एक व्यक्ती तिच्यासोबत होता. मात्र, आरोपी तिच्याशी बोलायला लागल्यानंतर तो व्यक्ती निघून गेला. दत्तात्रय गाडे याने तिच्याशी संवाद साधत तिला “सातारची बस तिकडे लागली आहे, मी तुला दाखवतो,” असे सांगितले.
बसमध्ये नेऊन दरवाजा लावला आणि नराधमतेचं कृत्य केलं
जेव्हा ती आरोपीच्या मागे जाऊ लागली, तेव्हा त्याने तिला बस दुसऱ्या ठिकाणी असल्याचे भासवले. बसजवळ पोहोचल्यावर तिने अंधार पाहून साशंकता व्यक्त केली, पण आरोपीने “ही रात्रीची बस आहे, दिवे बंद आहेत, तू आत जाऊन टॉर्चने बघ” असे सांगितले.
ती बसमध्ये चढताच, आरोपीनेही तिच्या मागोमाग जाऊन दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला. हा अमानुष प्रकार घडल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. तरुणी देखील दुसऱ्या बसमध्ये बसली आणि आपल्या गावी जात असताना तिने एका मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला.
मित्राने तिला तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडित तरुणी पोलिसांकडे पोहोचली आणि संपूर्ण घटनेचा तपशील सांगितला. पोलिसांनी स्वारगेट एसटी डेपोच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत शिरूर (Shirur) येथे राहणारा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी तातडीने आठ पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच, डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने परिसरातील शेतांमध्येही शोधमोहीम राबवली जात आहे. (Pune Crime )
महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न-
स्वारगेट सारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी एका शिवशाही बसमध्ये अशा प्रकारचा गुन्हा घडतो आणि आरोपी सहज पसार होतो, ही बाब धक्कादायक आहे. या घटनेमुळे पुण्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.
Title : Pune Crime 26-Year-Old Woman Raped in Shivshahi Bus at Swargate Depot






