Pune Water Crisis | पुणे (Pune) शहरातील नागरिकांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब, संभाव्य कमी पाऊस आणि धरणांतील घटता जलसाठा यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
धरणांतील घटता साठा वाढवतोय चिंता :
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधील उपलब्ध पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. गुरुवारी या चार धरणांतील एकत्रित जलसाठा केवळ 5.5 अब्ज घनफुटांपर्यंत खाली आला असून तो एकूण क्षमतेच्या 20 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील काही महिने पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सरासरीच्या सुमारे 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपलब्ध पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच दरम्यान जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकांना 15 टक्के पाणीकपात करण्याबाबत नोटीसही बजावली आहे.
Pune Water Crisis | महापालिकेकडून नियोजनाला वेग :
संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम (Navalkishor Ram) यांच्याकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय प्रशासनाने अंतर्गत स्तरावर सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. सर्व अधीक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्याचा सविस्तर मायक्रो प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू झाल्यास कोणत्या भागाला कोणत्या दिवशी आणि किती वेळ पाणी द्यायचे याचा तपशीलवार आराखडा तयार करून मुख्य कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर मान्सूनचे आगमन आणखी लांबले किंवा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले, तर पुणेकरांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






