Pravin Gaikwad | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी अक्कलकोटमधील शाईफेक प्रकरणानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिलं आहे. गायकवाड यांनी म्हटलं, “या हल्ल्यामागे कोण आहे, हे शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांची आहे.”
प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) हे अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना 13 जुलै रोजी त्यांच्यावर शाईफेक झाली. या घटनेनंतर भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी दीपक काटे याला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत.
“307 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता” – गायकवाडांचा आरोप :
गायकवाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, “दीपक काटेवर (Dipak Katekar) फक्त शाईफेकीचा गुन्हा दाखल करून त्याला सोडण्याचा डाव आहे. प्रत्यक्षात त्याच्यावर कलम 307 – हत्या करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता. हल्ल्याच्या वेळी तिथे सुमारे 50 जण उपस्थित होते, पण अटक फक्त दीपक काटे यालाच झाली.”
त्यांनी पुढे सांगितलं, “मंत्रालयातून फोन करून काटेला तुरुंगात त्रास देऊ नये, अशी सूचना दिली जात आहे. हे सगळं पूर्वनियोजित होतं आणि हल्लेखोराला राजकीय संरक्षण मिळतंय.”
Pravin Gaikwad | “संपवण्याचा कट आरएसएसच्या बैठकीत ठरला” – गायकवाडांचा गंभीर दावा :
गायकवाडांनी दावा केला की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याचा कट रचण्यात आला आहे. 2014 पासून पुरोगामी विचारधारेच्या लोकांना लक्ष्य करण्याची मोहीम सुरू आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवणाऱ्या संघटनांचा नायनाट करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.”
त्यांनी असेही म्हटलं की, “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे तिसऱ्या विचारधारेचा प्रभाव वाढत आहे, त्यामुळेच संघाने आता ही तिसरी फेरी सुरू केली आहे.” ((Pravin Gaikwad)
“दीपक काटे गुन्हेगार असूनही भाजप पदाधिकारी?” :
गायकवाडांनी विचारलं, “दीपक काटेवर अनेक गंभीर गुन्हे असतानाही तो भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस कसा काय झाला? त्याला संरक्षण देण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूचनाही दिल्या गेल्या आहेत.” याप्रकरणी संपूर्ण पुरोगामी चळवळ एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.






