Pravin Gaikwad | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संघाच्या बैठकीत बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला असून, अक्कलकोट येथे त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेमागेही असाच नियोजनबद्ध कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अक्कलकोटमध्ये शाईफेक, आरोपी भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी? :
13 जुलै रोजी प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) अक्कलकोटमध्ये फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस दीपक काटे याच्यासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून समर्थन दर्शवलं. दुसरीकडे, पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटनांनी गायकवाडांवर दुग्धाभिषेक करून पाठिंबा दर्शवला.
Pravin Gaikwad | “संघाच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा कट” – प्रवीण गायकवाड :
प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी म्हटलं की, “संघाच्या एका गुप्त बैठकीत बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडसारख्या पुरोगामी संघटनांना संपवण्याचा ठराव पारित झाला होता. 2014 नंतर अशा संघटनांवर हल्ल्यांची मालिका सुरू आहे. अक्कलकोटमधील हल्ला ही त्याचाच एक कडी आहे.”
त्यांनी आरोप केला की, “दीपक काटे याच्यावर आधीपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यालाच मुद्दामहून निवडून माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं.”
गायकवाडांनी पुढे दावा केला की, “आरोपीला वाचवण्यासाठी मंत्रालयातून थेट पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. एवढा गंभीर हल्ला असूनही किरकोळ कलमं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
त्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं आहे. “राज्याचे गृहमंत्री म्हणून पुरोगामी विचारांवर होणाऱ्या हल्ल्यांची जबाबदारी त्यांच्यावरच येते. त्यांनी यात स्पष्ट भूमिका घ्यावी,” अशी मागणी गायकवाडांनी केली.
हल्लेखोर दीपक काटे काय म्हणतोय? :
दीपक काटे (Dipak Kate) यांनी माध्यमांशी बोलताना शाईफेकीचं समर्थन करत म्हटलं, “संभाजी ब्रिगेडच्या नावात ‘छत्रपती’ किंवा ‘धर्मवीर’ यासारखा उल्लेख नसल्याने संभाजी महाराजांचा अवमान होतोय. आम्ही दीड-दोन वर्षांपासून हे नाव बदलण्याची मागणी करत होतो.”
त्यांनी सांगितलं की, “संघटनेचे काही नेते स्वामी समर्थांवर बेताल वक्तव्य करतात आणि त्याच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत सत्कार स्वीकारतात, त्यामुळे निषेध व्यक्त केला.”






