Vaishnavi Hagawane | पुण्यातील वैष्णवी हगवणे मुत्यू प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांचा थेट संबंध असल्याने राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या भूमिकेवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सुषमा अंधारेंची पोस्ट :
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया देत, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांवर टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, “ रूपाली चाकणकरांनी असंवेदनशीलतेनं वागणूक दिली, तर ठोंबरे गटाच्या रूपालीने वैष्णवीच्या बाळासाठी जे सहकार्य केलं, ते खरोखर कौतुकास्पद आहे.”
त्यांनी थेट विचारलं, “दादा, १०० पैकी ९० प्रकरणांमध्ये अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषांवर नेमलं?” त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली.
काय आहे हगवणे प्रकरण? :
वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून, वैष्णवीला पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा आणि दीर सुशील यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिला होता.
लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, आणि इतर मौल्यवान वस्तू दिल्यानंतरही, तिला वारंवार त्रास दिला जात होता. लग्नात भरघोस हुंडा दिल्यानंतरही सासरकडील मंडळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रणही आढळले, ज्यामुळे छळ स्पष्टपणे समोर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग यांनी स्वतःहून दखल घेतली असून, महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जर आरोप खरे ठरले, तर सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आयोगाने तीन दिवसांत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले असून, तो अहवाल लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे.






