PNG Connection | पश्चिम आशियातील तणावामुळे भारतात उर्जासंकट तीव्र झाले असून नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवत आहे. याचा थेट परिणाम गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवर झाला आहे. वाढलेल्या किमतींसोबतच वेळेवर सिलिंडर न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत, त्यामुळे सरकारकडून पीएनजी कनेक्शनकडे वळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
PNG कनेक्शनसाठी 3 महिन्यांची अट
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पीएनजी कनेक्शनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या भागात पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत कनेक्शनसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठीही हा नियम लागू असून विविध कंपन्यांमार्फत राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये पीएनजी सेवा दिली जात आहे. त्यामुळे ज्या भागात सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी विलंब न करता अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज न केल्यास LPG बंद होण्याची शक्यता
भुजबळ यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या भागात पीएनजी उपलब्ध असूनही नागरिकांनी त्यासाठी अर्ज केला नाही, तर त्यांना मिळणारा एलपीजी पुरवठा थांबवला जाऊ शकतो. मात्र, ज्यांनी पीएनजीसाठी अर्ज केलेला आहे आणि तरीही कनेक्शन मिळालेले नाही, त्यांचा एलपीजी बंद होणार नाही.
जर अर्ज कुठे करायचा याबाबत माहिती नसेल, तर नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा. पत्ता आणि आवश्यक माहिती देऊन अर्ज सादर करता येतो. ज्या भागात पीएनजीचे काम सुरू आहे, त्या ठिकाणीच हा नियम लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.






