Pune Road News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत वाहतूक कोंडी, अपघात सत्र आणि रस्ते जोडणीतील अडथळे दूर करण्यासाठी सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांना आता वेग आला आहे. मोठ्या निधी तरतुदीसह रस्ते विकास, चौक सुधारणांपासून मेट्रो व बोगदा प्रकल्पांपर्यंत अनेक कामे पुढे सरकत असून, यामुळे पुणे व उपनगरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
रस्ते व चौक सुधारणा उपक्रमांना वेग :
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वाहतुकीशी संबंधित प्रकल्पांसाठी एकूण ३३ हजार ७४४ कोटींची तरतूद करत १२७ रस्ते विकास उपक्रमांना अग्रक्रम दिला आहे. यामध्ये ५८९ किमी लांबीचे नवे रस्ते, विस्तार आणि रुंदीकरणाची कामे सुरू असून, अनेक प्रकल्प भूसंपादन आणि बांधकामाच्या अवस्थेत पुढे जात आहेत. यामुळे पुणे शहर तसेच जवळील उपनगरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.
वाहतूक ताण कमी करण्याच्या उद्देशाने १७ महत्त्वाच्या चौकांसाठी ४५ कोटींचा निधी मंजूर केला असून, ही सर्व कामे सध्या निविदा प्रक्रियेत आहेत. ही प्रकल्पे पूर्ण झाल्यावर सिग्नलवरील तासन्तास चालणारी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात आटोक्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच तीन प्रमुख पूल आणि उड्डाणपूल प्रकल्पांसाठी ४०३ कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park), चाकण MIDC (MIDC) आणि मुळशी-मावळ (Mulshi- Maval) परिसरातील वाढत्या अपघात आणि सातत्याने होणाऱ्या कोंडीचा विचार करून हे उपक्रम राबवले जात आहेत.
Pune Road News | मेट्रो मार्ग आणि येरवडा–कात्रज बोगद्याची तयारी :
पुणे मेट्रोचा (Pune Metro) २३ किमी लांबीचा मार्ग हा सार्वजनिक वाहतूक बळकटीसाठी महत्त्वाचा ठरणार असून, यासाठी तब्बल ७,४२० कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. हा मार्ग मार्चपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. मेट्रो सुरु झाल्यास पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवड (Pimpri chinchwad) परिसरातील प्रवास वेळेत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर २० किमी लांबीचा येरवडा–कात्रज (Yerwada- katraj) बोगदा हा प्रकल्पही प्राधिकरणाच्या विचाराधीन आहे. अंदाजे ७,५०० कोटी रुपयांच्या खर्चाचा हा बोगदा वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या या बोगदा प्रकल्पाची व्यवहार्यता चाचणी सुरू आहे. दरम्यान, यवत उड्डाणपूल, हिंगणगाव डबल डेकर उड्डाणपूल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Chowk) चौकातील डबल डेकर प्रकल्प हे हस्तांतरणाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचे अधिकारी सांगतात. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नवीन वर्षात मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे.






