पेट्रोलचे दर गगनाला भिडणार? नागरिकांची चिंता वाढली

On: May 22, 2026 6:31 PM
Petrol Price Hike
---Advertisement---

Petrol Price Hike | आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशात पुन्हा इंधनदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी आर्थिक फटका बसू शकतो. अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होत असून, भारतात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम :

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षजन्य परिस्थितीमुळे कच्चे तेल, गॅस आणि एलपीजी (LPG) यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना जास्त दराने इंधन आयात करावे लागत आहे. याआधी 15 मे रोजी सरकारने पेट्रोलच्या दरात 4 रुपये आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतरही तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण कायम असल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीपूर्वी सरकारी तेल कंपन्यांना दररोज सुमारे 1000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. किंमती वाढवल्यानंतर हा तोटा कमी होऊन अंदाजे 750 कोटी रुपयांपर्यंत आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे हा ताण अजूनही कायम असल्याचे मानले जात आहे.

Petrol Price Hike | तेल कंपन्यांवर मोठ्या तोट्याचा दबाव :

चालू आर्थिक तिमाहीत सरकारी तेल कंपन्यांचा एकत्रित तोटा 1 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पेट्रोल विक्रीवर कंपन्यांना प्रतिलिटर सुमारे 14 रुपयांचा तोटा होत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोलच्या किमतीत आणखी वाढ अपरिहार्य ठरू शकते.

सध्या मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 103 रुपयांवरून 107 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे, तर डिझेलचा दर 90 रुपयांवरून 93 रुपये प्रतिलिटर झाला आहे. जागतिक स्तरावरही इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली जात आहे. मलेशिया (Malaysia) मध्ये 56 टक्के, पाकिस्तान (Pakistan) मध्ये 55 टक्के, युएई (UAE) मध्ये 52 टक्के आणि अमेरिका (America) मध्ये 45 टक्क्यांनी दर वाढल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय कॅनडा (Canada), चीन (China) आणि इंग्लंड (England) यांसारख्या देशांमध्येही इंधन महागले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, वाहतूक खर्च वाढून महागाईत आणखी भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

News title : Petrol Price Hike Alert India

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now