PCMC News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणतेही आवडले नाही की, ते तिथल्या तिथे सुनावतात, मग ते अधिकारी असोत वा पक्षातील सहकारी. असाच स्पष्टवक्तेपणा त्यांनी पुण्यात पुन्हा एकदा दाखवला. भर व्यासपीठावरुन बोलताना अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना तर फटकारलंच शिवाय भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना सुद्धा खडेबोल सुनावले.
अजित पवारांच्या टार्गेटवर पिंपरी चिंचवड पोलीस-
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि पुणे (Pune) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात अजित पवार यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला. त्यांनी पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त करत, “पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC News) एवढ्या मोठ्या इमारती बांधून देतो, सोयी-सुविधा पुरवतो, तरी गुन्हेगारी का वाढतेय?” असा थेट सवाल केला.
“वाहन तोडफोड करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करा. कोयता गँगवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर मकोका (MCOCA) लावा आणि त्यांची शहरातून धिंड काढा!” अशी थेट सूचना त्यांनी पोलिसांना दिली. अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.
महेश लांडगेंना फडणवीसांसमोरच सुनावले
PCMC News : या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी थेट महायुतीतील भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांना फटकारले. “पिंपरी चिंचवडचा विकास माझ्या कारकीर्दीत झाला, पण महेश माझं नाव घेत नाहीत. शेवटी आपण महायुतीत आहोत, हे लक्षात ठेवा!” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
लांडगेंना त्यांनी स्पष्ट सांगितले की, “चांगलं काम झालं असेल तर ते कबूल करायला काही हरकत नाही. सत्य स्वीकारा आणि महायुतीतील सहकाऱ्यांचा आदर करा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये चर्चेचा विषय रंगला.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देत त्यांनी शहराच्या सुरक्षिततेवर भर देण्याचे आवाहन केले.






