पिंपरी-चिंचवडचा ‘दादा’ कोण? आज फैसला! मतमोजणीला सुरुवात

On: January 16, 2026 11:23 AM
PCMC Election 2026
---Advertisement---

PCMC Election 2026 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली असून आज शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मनपा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून निवडणूक विभागाने ओळखपत्र दिलेल्या पात्र व्यक्तींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला आहे. (PCMC result)

या निवडणुकीची मतमोजणी महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या आठ ठिकाणी होणार असून प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

आठ ठिकाणी होणार मतमोजणी :

प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ येथील मतमोजणी स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी येथे होत आहे. यामध्ये प्रभाग १० साठी १७ फेऱ्या, प्रभाग १४ व १९ साठी प्रत्येकी १८ फेऱ्या तर प्रभाग १५ साठी १५ फेऱ्या पार पडणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग १६, १७, १८ व २२ येथील मतमोजणी ऑटो क्लस्टर येथील छोटा हॉल, चिंचवड येथे पार पडत असून यासाठी प्रत्येकी १४ ते १६ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ येथील मतमोजणी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे होत असून येथे १७ ते २१ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होईल. तसेच प्रभाग २५, २६, २८ व २९ येथील मतमोजणी ड क्षेत्रीय कार्यालय, औंध-रावेत बीआरटी रोड, रहाटणी येथे होत आहे. (Pimpri Chinchwad counting)

PCMC Election 2026 | सुरक्षाव्यवस्था आणि पारदर्शकतेवर भर :

प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ येथील मतमोजणी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरीच्या मागील बाजूस असलेल्या कबड्डी प्रशिक्षण संकुलात होत असून तळमजल्यावर स्ट्राँग रूम आणि पहिल्या मजल्यावर मतमोजणी होत आहे. प्रभाग १, ११, १२ व १३ येथील मतमोजणी घरकुल चिखली टाऊनहॉल येथे होत आहे.

याशिवाय प्रभाग २१, २३, २४ व २७ येथील मतमोजणी स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव येथे तर प्रभाग २०, ३०, ३१ व ३२ येथील मतमोजणी कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल) येथे होत आहे. प्रशासनाकडून सुरक्षाव्यवस्था, शिस्तबद्ध प्रवेश प्रक्रिया आणि संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शक निकाल जाहीर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

News Title: PCMC Election 2026: Pimpri-Chinchwad Municipal Corporation Counting to Begin at 10 AM

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now