Parth Pawar | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना धारेवर धरलं जात होतं. त्यांना बदनाम केलं जात असल्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता या वादात पार्थ पवार यांनी उडी घेतलीय. पार्थ यांनी समोर येत ज्येष्ठ नेत्यांवर होणाऱ्या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे.
पार्थ पवारांचे स्पष्टीकरण आणि नेत्यांची पाठराखण
अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या, त्यांच्या आरोपांच्या केंद्रस्थानी प्रामुख्यानं दोन नावं होती, एक सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल… दोघांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी चालवला होता, मात्र अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. पार्थ यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, प्रफुल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना निराधार आणि कुठलाही तर्क नसलेल्या अत्यंत खोट्या नरेटिव्हच्या आधारे बदनाम केलं जात आहे. त्यांची पक्षावर असलेली अनेक दशकांपासूनची निष्ठा आणि समर्पण आजही आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना खोट्या वादांमध्ये ओढणं अत्यंत दुर्देवी आहे आणि याचा ठामपणे निषेध केला पाहिजे.
निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र आणि पक्षांतर्गत वाद
अजित पवारांचे २८ जानेवारी रोजी निधन झाल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी (Election Commission) पत्रव्यवहार केला होता. या निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली होती की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जे अधिकार बहाल करण्यात आले आहेत, तसेच अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांनाही देण्यात यावेत. या पत्राची माहिती बाहेर येताच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आणि पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला.
दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) प्रणित गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून हा मूळ पक्षच पळवला जात असल्याचा गंभीर आरोप आधीपासूनच केला जात होता. अशातच, या पत्राची माहिती उघड झाल्यानंतर अनेक चुकीच्या बातम्या पसरल्या. परंतु, १० मार्च रोजी पक्षाच्या अधिकृत राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला आणखी एक पत्र पाठवले. २८ जानेवारीनंतर आयोगाकडे केलेल्या कोणत्याही मागण्या किंवा पत्रांची दखल घेऊ नये, असे त्यांनी त्यात स्पष्ट केल्याने पटेल आणि तटकरे यांना बाजूला केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.






