Dasara Melava 2025 | बीड (Beed) जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे, म्हणजेच राष्ट्रसंत भगवान बाबांची (Bhagawan Baba) जन्मभूमी असलेल्या पवित्र भूमीवर, यंदाही भाजप (BJP) नेत्या व मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे हे अकरावे वर्ष असून, तो 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. भगवान बाबांची जन्मभूमी असल्याने या ठिकाणाला विशेष आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा इतिहास काय
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या काळात दसरा मेळावा भगवान गडावर भरायचा. या मेळाव्यातून ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करायचे. मात्र 2014 मध्ये त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी ही परंपरा पुढे नेली. त्यानंतर भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री (Namdev Shastri) यांनी गडावर राजकीय कार्यक्रम होऊ नयेत, या कारणास्तव गडावरील दसरा मेळावा बंद केला. यानंतर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यात मतभेद निर्माण झाले.
2015 साली पंकजांनी मेळावा गडाच्या पायथ्याशी भरवला, तर 2016 पासून सावरगाव घाट येथे हा मेळावा आयोजित होऊ लागला. हे ठिकाण निवडताना पंकजांनी गुप्तता पाळली होती आणि पहिल्याच मेळाव्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते.
Beed | माजी मंत्री धनंजय मुंडेंचीही उपस्थिती
लोकसभा निवडणुकीपासूनच माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि बहीण पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा संपुष्टात आला. 2024 च्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनीही उपस्थिती दर्शवली. यंदा देखील दोन्ही भाऊ-बहीण एकत्रित व्यासपीठावर असतील.
“वंचितांचा, शोषितांचा मेळावा” म्हणून पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भगवान भक्ती गडावर दाखल होणार आहेत.
सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचत असलेली भव्य मूर्ती असून, तळघरात देखील त्यांची प्रतिमा आहे. या मेळाव्याला दरवर्षी वंजारी समाजासह ओबीसी समाजाचे लाखो बांधव हजेरी लावतात. त्यामुळे हा मेळावा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या बीड मधील राजकीय परिस्थिती आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. त्यामुळे या मेळाव्यात मुंडे भाऊ-बहीण काय बोलतात याकडे, सर्व ओबीसी समाजाचे लक्ष आहे. तसेच या मेळाव्याला महाराष्ट्रातून अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहतात.
News Title :- Pankaja Munde’s Dussehra Rally at the Birthplace of Rashtrasant Bhagwan Baba






