वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यातील धायरीतील ग्रामस्थांचा मोठा निर्णय!

On: June 2, 2025 1:21 PM
Vaishnavi Hagawane
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | पुण्यात हुंड्यासाठी छळ होऊन वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) या विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. वैष्णवीने जीवन संपवलं नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा वैष्णवीच्या कुटुंबीयांचा दावा आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे. या धक्कादायक खुलास्यानंतर हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी धाडसी पाऊल उचलले आहे. ‘नो प्री-वेडिंग, नो मानपान… पत्रिका नाही पाहिली तरी चालेल, पण मुलांची आरोग्य तपासणी करा,’ असा महत्त्वपूर्ण निर्णयच धायरी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे, ज्यामुळे सामाजिक परिवर्तनाची एक नवीन लाट सुरू झाली आहे. (Vaishnavi Hagawane Case Update)

वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर, हुंडाबंदीसह लग्नातील इतर अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारला. धायरी येथे आयोजित ग्रामसभेत मराठा, बहुजनांसह अठरापगड जातीच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या ग्रामसभेत सर्वांनी एकमताने ‘हुंडा न देणे आणि हुंडा न घेण्याचा’ ठराव मंजूर केला. याशिवाय, लग्नातील अनेक चुकीच्या प्रथा बदलण्याचे महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी मंजूर करण्यात आले. (Dhayari Pre-Weeding)

या ग्रामसभेत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे आहेत:

-हुंड्यावरून छळ होऊ द्यायचा नाही आणि तो सहनही करायचा नाही. हुंड्यावरून छळ होत असल्यास मुलीला सासरी पाठवायचे नाही.
– कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न पार पाडावीत. लग्न वेळेतच लावून एकाच दिवशी साखरपुडा, लग्न आणि अन्य विधी करावेत.
– मान्यवरांनी स्टेजवर गर्दी करणे टाळावे. नेत्यांच्या मानपानात वेळ वाया घालवू नये आणि सत्कार करू नयेत. (Dhayari Pre-Weeding)
– साखरपुड्याला कमी महिला आणि कमी पुरुषांनी औक्षण करावे. लग्नात नाहक खर्च करू नये आणि जेवणामध्ये मोजकेच पदार्थ असावेत. जास्त पदार्थ टाळावेत.
– पारण्याच्या मिरवणुका आणि त्यामुळे होणारी गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
– प्री-वेडिंग शूटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वाया जाणारा वेळ वाचवावा.

Vaishnavi Hagawane | महत्वाचा ठराव ग्रामसभेत मंजूर :

याशिवाय, फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांनाही याबाबत समज देण्यात यावी, असे ठरले. लग्न ठरण्यापूर्वी एकवेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल, पण मुलांची शारीरिक आरोग्य तपासणी करूनच लग्ने ठरवावीत, यावर विशेष भर देण्यात आला. लग्नात काय दिले आणि काय नाही, याची चर्चा करू नये. सोने, चांदी आणि आहेर यांचा उल्लेख टाळावेत. आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात यावा, असाही ठराव या ग्रामसभेत मंजूर झाला. या ठरावांचे फलक गावात लावण्यात यावेत, जेणेकरून सर्वांना त्याची माहिती होईल. चुकीच्या प्रथा बंद करून मुलगा आणि मुलगी कसे सुखी राहतील, याचा विचार करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव या ग्रामसभेत करण्यात आला.

अहिल्यानगर येथील सुवर्णम प्राईड येथे मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीतही वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीत समाजहितासाठी काही सूचना करण्यात आल्या: हुंडा प्रथा बंद करून त्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) करावी. पैशांसाठी मुलीचा छळ करू नये. (Vaishnavi Hagawane Case Update)

‘प्री-वेडिंग’ (Dhayari Pre-Weeding) प्रकार बंद करावा; जर प्री-वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवले, तर प्रतिष्ठित व्यक्ती विवाह सोहळा सोडून निघून जातील, असा इशाराही देण्यात आला. लग्न सोहळा १०० ते २०० लोकांमध्येच करावा. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोक कलावंतांचा वापर करावा. लग्न सोहळा वेळेवरच पार पाडावा, असे नियम घालून देण्यात आले. हे नियम सक्तीचे नसले तरी, समाजहित लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांनी ते पाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

News Title: No Pre-Wedding, No Grand Welcomes: Pune Villagers Make Big Decisions After Vaishnavi Hagawane Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now