महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीत १४ महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; जाणून घ्या कोणाला होणार फायदा!

On: November 25, 2026 6:19 PM
Maharashtra Cabinet Decisions
---Advertisement---

Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाची आज अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या बैठकीत राज्यातील विविध घटकांच्या हिताचे तब्बल १४ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे हे निर्णय असून, त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेषतः अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रति व्यक्ती पाच किलो (तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू) मोफत धान्य देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा :

जलसंपदा व सिंचन क्षेत्रासाठीही मंत्रिमंडळाने मोठी तरतूद केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून, याअंतर्गत सहा वळण बंधारे उभारले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्यासोबतच ११.५० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमीन देण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्लूएस) विद्यार्थ्यांच्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यात भोजन व निवासासाठी भरीव वाढ करण्यात आली आहे. शालार्थ प्रणालीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत आर्थिक सक्षमीकरणाची सुविधा मिळणार आहे. याशिवाय खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आणि खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक विधेयक आणण्यास मान्यता दिली आहे.

Maharashtra Cabinet Decisions | गृह विभागाने उचलले महत्त्वपूर्ण पाऊल :

आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी गृह विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद करण्यासाठी स्वतंत्र ‘एमपीआयडी’ न्यायाधिकरण स्थापन करून ९० दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या अर्धन्यायिक कामकाजासाठी ‘महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली’ व ‘एक जिल्हा एक अपील’ तरतूद लागू करण्यासह महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

यासोबतच कामगार कल्याणाच्या दृष्टीने माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ आणि खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियमातील परिभाषांमध्ये एकसमानता आणणे, एनसीएएचपी कायद्यातून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळणे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावांवरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.

News Title: Maharashtra Cabinet Approves 14 Key Decisions

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now