Lockdown Rumors India | मध्यपूर्वेतील तणाव आणि इंधन पुरवठ्याच्या चर्चांदरम्यान देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट शब्दांत या अफवांना फेटाळून लावत कठोर इशारा दिला आहे. लॉकडाऊनची कोणतीही परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले असून खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे काही ठिकाणी एलपीजी आणि इंधनाच्या उपलब्धतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर देशभरात लॉकडाऊन लागणार असल्याचे संदेश आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचेही पाहायला मिळत आहे.
अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई होणार :
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि केंद्र सरकारनेही अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फेसबुक, एक्स किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे संदेश पोस्ट करणे किंवा व्हॉट्सअॅपवर अशा पोस्ट पुढे फॉरवर्ड करणे हे देखील गुन्हा ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही माहिती खात्री करूनच शेअर करावी आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Lockdown Rumors India | देशात इंधनाचा पुरेसा साठा :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा आहे. देशात सध्या जवळपास एक महिन्याचा पेट्रोल-डिझेलचा साठा उपलब्ध असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढतो.
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यातही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 20 टक्के असलेला पुरवठा आता 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत गॅसचा पुरवठा अधिक सुरळीत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.






