निलेश घायवळच्या अडचणीत मोठी वाढ, ‘या’ कारणामुळे बसला 38 लाखांचा फटका

On: October 1, 2025 4:42 PM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोथरूडमधील गोळीबारानंतर त्याने थेट परदेशात पळ काढल्याची माहिती समोर आली असून, सध्या तो स्विझर्लंडमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पोलिसांकडे त्याला भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, घायवळविरुद्ध कठोर पावले उचलत पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या मालकीच्या एका व्यावसायिक आस्थापनेची मिळून तब्बल दहा बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये मिळून एकूण ३८ लाख २६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. ही कारवाई करून गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर थेट घाव घालण्यात आल्याचे मानले जात आहे.

पोलिसांचा आर्थिक स्रोतांवर घाव :

घायवळ टोळीच्या कारवायांमुळे पुण्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोथरूड परिसरात टोळीतील गुंडांनी दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवली आणि त्यानुसार घायवळसह दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली. इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर तपास सखोलपणे सुरू आहे.

याच तपासादरम्यान पोलिसांनी घायवळचे देशांतर्गत आर्थिक व्यवहार उघडकीस आणले. त्याच्याकडे आणि त्याच्या कुटुंबीयांकडे असलेली बँक खाती तपासून ती गोठवण्याची कारवाई केली. पोलिसांचा दावा आहे की, त्यांचा यामागचा उद्देश गुन्हेगारी टोळ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणे हा आहे.

Nilesh Ghaiwal | … तर त्यांच्या गुन्हेगारी हालचालींना मोठा आळा बसेल :

तपासात आणखी काही आर्थिक व्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारे टोळ्यांचे निधी थांबवले गेले तर त्यांच्या गुन्हेगारी हालचालींना मोठा आळा बसेल.

घायवळविरुद्ध कारवाईबाबत पोलिसांनी पासपोर्ट विभागाकडे माहिती मागवली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्याकडे किती पासपोर्ट आहेत, याबाबतची शंका कायम आहे. या विलंबामुळे चौकशीत काही प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना मोठा धक्का :

निलेश घायवळचा परदेशातील ठावठिकाणा पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. मात्र, आर्थिक घाव घालण्याची मोहीम पोलिसांनी वेगाने सुरू केली असून, यामुळे गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. तर पोलिसांनी, घायवळ विरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तक्रारदारांना संरक्षण दिल्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होणार आहे. घायवळला भारतात परत आणता येईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

News title : Nilesh Ghaywal fled to Switzerland, information from Pune Police

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now