EVM सोबतचं ‘ते’ नवीन मशीन नक्की कोणतं?” राज ठाकरेंचा संताप

On: January 14, 2026 1:26 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, मतदानाच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुरुवारी १५ जानेवारीला मतदान होणार असतानाच, प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना मतदानाच्या दिवशीपर्यंत घरोघरी भेटी देण्याची मुभा देणाऱ्या नव्या नियमावरून राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. (Election Commission controversy)

आम्ही अनेक वर्षांपासून निवडणुका पाहत आलो आहोत, प्रचार संपल्यानंतर पुढचा दिवस शांततेचा आणि त्यानंतर मतदान हीच परंपरा होती, असे सांगत राज ठाकरे यांनी नव्या नोटिफिकेशनवर संताप व्यक्त केला. प्रचार बंद असतानाही मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, ही मुभा अचानक कुठून आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हा नियम का नव्हता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रचारानंतर भेटी आणि पैसे वाटपाचा संशय :

मतदारांना भेटण्याची परवानगी म्हणजे अप्रत्यक्षपणे पैसे वाटपाची मुभा आहे का, असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला. पॅम्प्लेटच्या आत पैसे टाकून देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी शिवसैनिक आणि मनसेसैनिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. उमेदवार लोकांकडे जात आहेत, पैसे कसे आणि कुठे वाटले जात आहेत यावर लक्ष ठेवा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

निवडणूक आयोग सरकारला मदत करत असल्याचा थेट आरोप करत राज ठाकरे यांनी म्हटले की, ही निवडणूक पद्धत लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकते. लोक पैसे नाकारत आहेत ही चांगली बाब आहे, मात्र असे प्रकारच का घडू द्यावे लागतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या निवडणुकीपुरताच असा नियम का लागू करण्यात आला, यामागे कोणाचा हेतू आहे, हे जनतेने पाहावे, असे ते म्हणाले.

EVM सोबतची नवीन मशीन कोणती? राज ठाकरेंचा सवाल :

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईव्हीएमसोबत (EVM) वापरात आणलेल्या नव्या मशीनवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ईव्हीएम जुनी झाली म्हणून नवीन युनिट जोडले जात असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र ही ‘प्रिटिंग ऑक्झिलरी युनिट’ नेमकी कोणती आहे, ती कशी दिसते आणि ती कशासाठी वापरली जाते, याची माहिती कोणत्याही राजकीय पक्षाला देण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. (Election Commission controversy)

यापूर्वी ईव्हीएम बूथवर सर्व पक्षांसमोर तपासून दाखवली जात असे, आता आलेली नवीन मशीन मात्र कोणालाही दाखवली जात नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे राज ठाकरे म्हणाले. इतकी बेबंदशाही कधीच पाहिली नाही, ही कोणती निवडणूक आणि काय प्रकारचं राजकारण सुरू आहे, याकडे जनतेने डोळसपणे पाहावे, असे आवाहन करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरील संशय अधिक तीव्र केला आहे.

News Title : New Machine Along with EVM? Raj Thackeray Questions Election Commission, Raises Serious Allegations

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now