Pik Vima 2026 | खरीप हंगाम 2026 साठी राज्य सरकारने पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. यंदापासून पीक विमा अर्ज करताना काही नवीन अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पारदर्शकता वाढवणे, अपात्र अर्ज रोखणे आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा या उद्देशाने नवीन नियम लागू करण्यात आले असून, नियमांचे पालन न केल्यास विमा दाव्यापासून वंचित राहावे लागू शकते.
ई-पीक पाहणी आणि Farmer ID अनिवार्य :
यंदाच्या खरीप हंगामापासून ई-पीक पाहणी (e-Peek Pahani) सक्तीची करण्यात आली आहे. शेतात प्रत्यक्ष कोणत्या पिकाची लागवड करण्यात आली आहे, याची अधिकृत नोंद ई-पीक पाहणीद्वारे झाल्यानंतरच पीक विमा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद पूर्ण झाली आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक ठरणार आहे.
याशिवाय, ॲग्री स्टॅक (Agri Stack) अंतर्गत Farmer ID देखील अनिवार्य करण्यात आला आहे. इतर अनेक शासकीय योजनांप्रमाणे आता पीक विमा योजनेसाठीही Farmer ID आवश्यक असेल. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID तयार केलेला नाही, त्यांनी तो तातडीने तयार करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या नव्या नियमांनुसार अर्जातील सर्व माहिती आणि संबंधित कागदपत्रांमध्ये अचूकता असणे अत्यावश्यक आहे.
Pik Vima 2026 | चुकीची माहिती दिल्यास कठोर कारवाई :
पीक विमा प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मयत व्यक्तीच्या नावाने विमा अर्ज केल्याचे आढळल्यास भरलेला विमा हप्ता जप्त केला जाणार आहे. तसेच खोटी माहिती देणे, बनावट कागदपत्रे सादर करणे किंवा फसवणुकीच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित लाभार्थ्याला पाच वर्षांसाठी थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT), नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसह इतर विविध शासकीय योजनांमधूनही अपात्र किंवा ब्लॉक केले जाऊ शकते.
याशिवाय, यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 गुंठे शेती क्षेत्राची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रतेची खात्री करून घ्यावी. कृषी विभागाने (Agriculture Department) सर्व शेतकऱ्यांना अधिकृत माहितीच्या आधारेच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ई-पीक पाहणी, Farmer ID, जमिनीची अचूक नोंद आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास विमा अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि भविष्यातील अडचणी टाळता येतील.






