Credit Score New Rules | कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून क्रेडिट स्कोअर संदर्भात नवे नियम लागू करण्यात येणार असून हे नियम जानेवारी 2026 पासून अमलात येणार आहेत. या बदलांचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. नवीन नियमानुसार आता नागरिकांचा क्रेडिट स्कोअर दर दोन आठवड्यांनी म्हणजेच 14 दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. (Credit Score New Rules
आत्तापर्यंत क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे कर्ज फेडल्यानंतर किंवा सुधारणा केल्यानंतरही स्कोअरमध्ये बदल दिसण्यासाठी ग्राहकांना बराच काळ वाट पाहावी लागत होती. मात्र नव्या नियमांमुळे ही अडचण दूर होणार आहे.
दर 14 दिवसांनी क्रेडिट स्कोअर होणार अपडेट :
आरबीआयने बँका आणि एनबीएफसींना स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्यांनी महिन्यातून किमान दोन वेळा सिबिल, एक्सपेरियन, इक्विफॅक्स आणि सीआरआयएफ हाय मार्क या क्रेडिट ब्युरोंना ग्राहकांची माहिती पाठवावी. त्यामुळे क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट अधिक जलद आणि अचूक पद्धतीने अपडेट होतील.
येत्या काळात कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्या आणि आपला क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. प्रीपेमेंट किंवा कर्ज पूर्णपणे फेडल्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर लवकर दिसून येईल, त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगवान होईल.
Credit Score New Rules | बँक आणि ग्राहक दोघांनाही होणार फायदा :
नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहक आणि बँक दोघांनाही याचा फायदा होणार आहे. ग्राहकाचा क्रेडिट प्रोफाइल लवकर अपडेट झाल्याने कर्ज मंजुरीचा कालावधी कमी होईल. त्याचबरोबर बँकांना ग्राहकाची जोखीम अधिक अचूकपणे मोजता येणार आहे. (Credit Score New Rules)
क्रेडिट स्कोअर हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. नवीन कर्ज घेणे, ईएमआय वेळेवर किंवा उशिरा भरणे, कर्जात डिफॉल्ट होणे, तसेच बँकांच्या अहवालातील चुका या सर्व बाबींमुळे क्रेडिट स्कोअरमध्ये बदल होत असतो.
क्रेडिट रिपोर्ट पाहिल्यास त्वरित अलर्ट :
आरबीआयच्या नियमांनुसार, जेव्हा जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट रिपोर्ट पाहते, तेव्हा ग्राहकाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे त्वरित अलर्ट मिळणार आहे. यामुळे फसवणुकीपासून संरक्षण मिळणार असून, कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्या नावावर कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला लगेच माहिती मिळेल.
तसेच कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकाला पूर्वसूचना न देता डिफॉल्टर घोषित करू शकणार नाही. क्रेडिट ब्युरोकडे माहिती पाठवण्यापूर्वी एसएमएस किंवा ईमेल अलर्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. (RBI Credit Score Update)
तक्रार न सुटल्यास मिळणार नुकसान भरपाई :
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, जर बँक किंवा क्रेडिट ब्युरोने ग्राहकाची तक्रार 30 दिवसांत सोडवली नाही, तर ग्राहकाला दररोज 100 रुपयांची नुकसान भरपाई देणे बंधनकारक असेल. तसेच क्रेडिट माहिती दुरुस्त करण्याची विनंती केल्यानंतर 30 दिवसांच्या आत ती अपडेट करणेही आवश्यक राहणार आहे.






