Credit Card Rules | देशभरात 1 जूनपासून विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल अमलात आले असून त्याचा परिणाम बँकिंग आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांवरही होणार आहे. अनेक बँकांनी आपल्या क्रेडिट कार्ड सेवांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. विशेषतः रिवॉर्ड पॉइंट्स, व्यवहार शुल्क आणि अलर्ट सेवांबाबतचे बदल लाखो ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करू शकतात.
क्रेडिट कार्डचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हे बदल समजून घेणे आवश्यक ठरणार आहे. कारण यामुळे खर्चाचे नियोजन, मिळणारे लाभ आणि अतिरिक्त शुल्क यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे कार्डधारकांनी नव्या नियमांची माहिती घेऊनच पुढील आर्थिक व्यवहार करावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
रिवॉर्ड पॉइंट्स आणि शुल्कांमध्ये बदल :
अनेक बँकांनी युटिलिटी बिले, इंधन, भाडे, विमा आणि इतर नियमित खर्चांवर दिल्या जाणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लाभ मिळणार नसल्याने ग्राहकांनी आपल्या कार्डच्या अटी नव्याने तपासणे गरजेचे झाले आहे.
कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) ने 1 जूनपासून आपल्या विविध क्रेडिट कार्ड्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत. युटिलिटी बिल, फ्यूल, रेंट आणि इन्शुरन्सवरील रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यासाठी आता मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय जमा झालेल्या पॉइंट्सच्या रिडेम्प्शनचे मूल्यही कमी करण्यात आले आहे. तसेच भाडे आणि शैक्षणिक शुल्काच्या सर्व व्यवहारांवर 1 टक्के निश्चित व्यवहार शुल्क आकारले जाणार आहे. युटिलिटी पेमेंट, वॉलेट लोडिंग, ऑनलाइन गेमिंग आणि इंधन व्यवहारांमध्ये ठरावीक मर्यादा ओलांडल्यानंतर 1 टक्के अतिरिक्त शुल्क लागू होईल. मात्र व्हाईट रिझर्व्ह, सॉलिटेअर, इनफिनिट, सिग्नेचर, इंडियन ऑइल आणि मिंत्रा कोटक कार्डधारकांना इंधन शुल्कातून सवलत मिळणार आहे.
Credit Card Rules | बँकांच्या इतर सेवांमध्येही सुधारणा :
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने आपल्या वन को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील थकीत रकमेच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 3.49 टक्के असलेला मासिक व्याजदर 23 जून 2026 पासून 3.75 टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) देखील 18 जूनपासून अमेझॉन पे (Amazon Pay) क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या भाडे भरण्याच्या व्यवहारांवरील 1 टक्के रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ बंद करणार आहे.
एचडीएफसी बँक (HDFC Bank) नेही आपल्या अलर्ट प्रणालीमध्ये बदल जाहीर केले आहेत. 25 जून 2026 पासून लहान व्यवहारांसाठी एसएमएस सूचना पाठविणे बंद केले जाणार आहे. यूपीआय (UPI) व्यवहारांसाठीच संदेश पाठवले जातील. पैसे पाठवताना 100 रुपयांपेक्षा अधिक आणि पैसे प्राप्त करताना 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठीच एसएमएस अलर्ट मिळतील.
मात्र सर्व व्यवहारांची माहिती ई-मेलद्वारे पूर्वीप्रमाणे उपलब्ध राहणार आहे. बँकांच्या मते, ग्राहकांच्या सोयीसह खर्च व्यवस्थापन लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांनी आपल्या कार्डवरील अटी, शुल्क आणि रिवॉर्ड धोरणांची नियमित माहिती घेऊनच व्यवहार करावेत तसेच थकीत रक्कम वेळेत भरून उपलब्ध लाभांचा योग्य वापर करावा.






