Pune News | महाराष्ट्रात रेल्वेसोबतच एसटी बससेवेला आजही मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची पसंती मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारी ही जीवनवाहिनी अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
दौंड शहरातील जुने बसस्थानक आणि एसटी आगाराच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने तब्बल 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे दौंडकरांना लवकरच अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे नवे बसस्थानक मिळणार असून, प्रवाशांचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (MSRTC bus stand renovation)
आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश :
दौंड बसस्थानकाची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, परिवहन व गृह विभागाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. (Daund Bus Stand)
31 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाकडून यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे बसस्थानक आणि आगाराच्या कायापालटाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pune News | बसस्थानकाचा होणार संपूर्ण कायापालट :
मंजूर करण्यात आलेल्या निधीतून दौंड बसस्थानक आणि एसटी आगाराची संपूर्ण पुनर्बांधणी केली जाणार आहे. मुख्य आगाराची इमारत दुरुस्त करून चालक आणि वाहकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे व विश्रांतीगृह उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृहाची तरतूद करण्यात येणार आहे. (Pune district news)
याशिवाय लाईन चेकिंग पथकासाठी स्वतंत्र खोली, विविध विभागांसाठी नवीन इमारती तसेच आगार आणि बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 2 कोटी 77 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक अग्निशमन व्यवस्था, संरक्षण भिंत आणि नवीन प्रवेशद्वार अशा आधुनिक सुविधा देखील या प्रकल्पात समाविष्ट असणार आहेत. या भरीव निधीमुळे दौंडकरांना लवकरच सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक बसस्थानकाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






