Pune News | पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला आहे. गेल्या तब्बल ११ वर्षांत सातत्याने केलेल्या विकासकामांची आणि जनतेशी असलेल्या नात्याची ही निवडणूक थेट परीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर हे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत पक्षापेक्षा नागरिकांचा सहभाग आणि विश्वास अधिक निर्णायक ठरत असल्याचे चित्र प्रभागात दिसून येत आहे.
११ वर्षांचा विकासकामांचा ठोस लेखाजोखा
प्रभागात दीर्घकाळ काम करताना अमोल बालवडकर यांनी अनेक जनोपयोगी आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित उपक्रम राबवले आहेत. बाणेर-बालेवाडी परिसरात सुरू केलेल्या संपर्क कार्यालयांमुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय दाखले अशा कागदपत्रांच्या समस्यांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या चार वर्षांत २५ हून अधिक ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.
मिशन निर्मल अंतर्गत १०० दिवसांत १०० किलोमीटर परिसर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम, सलग १० वर्षे १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करून कोणतेही घर सणाच्या काळात वंचित राहू नये याची घेतलेली काळजी, या उपक्रमांनी प्रभागात सामाजिक बांधिलकीचा वेगळाच आदर्श निर्माण केला असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
Pune News | नागरिकांचा विश्वास हीच खरी ताकद
प्रभागात २४x७ पाणी योजना, सुस-पाषाण खिंड पूल, स्मार्ट स्ट्रीट्स आणि स्मार्ट लाईट्स, ओपन जिम, हरित उपक्रम, बाणेर येथील मनपा रुग्णालयाची उभारणी, तसेच QRT – क्विक रिस्पॉन्स टीमद्वारे रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि स्ट्रीटलाइटसारख्या तक्रारींवर तातडीने निर्णय घेण्यात आले. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि खेळाडूंसाठीही विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात आले.
यासंदर्भात बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, संघर्षाच्या काळात प्रभागातील जनतेने दिलेले प्रेम आणि पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. जनतेला आपल्या कामांचा अनुभव आहे आणि हाच जनविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयात रूपांतरित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग ९ मध्ये ही निवडणूक विकासकामांची पोचपावती ठरेल, असा दावा त्यांनी केला.






