Independence Day | भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आगामी काळातील विकासाची दिशा स्पष्ट केली. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत 2047, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर देताना त्यांनी देशाच्या प्रगतीचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त केली. पुढील 25 वर्षे भारतासाठी निर्णायक असल्याचेही त्यांनी सांगितले.
Independence Day | पुढील दशकात तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना :
या शतकातील पहिली 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील 25 वर्षांचा काळ देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. मागील पाच ते सात दशकांत जी उद्दिष्टे पूर्ण करता आली नाहीत, ती कामे पुढील पाच ते सात वर्षांत पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. भारताची युवाशक्ती ही देशाची मोठी ताकद असून तिच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ उद्दिष्टे निश्चित करून चालणार नाही, तर काम करण्याची पद्धत, विचारसरणी आणि विकासाची गती यामध्येही बदल घडवावा लागेल, असा संदेश त्यांनी दिला.
डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी सेमीकंडक्टर चिप्स अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये चिप्सची भूमिका महत्त्वाची आहे. भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा कारखाना सुरू झाला असून, येथून तयार होणाऱ्या चिप्सची निर्यातही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील सात ते आठ वर्षांच्या कालावधीत देशभरात आणखी पाच ते सात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी जाहीर केले. त्यामुळे देशाच्या तंत्रज्ञान क्षमतेला आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.
Independence Day | अणुऊर्जा, तेल आणि स्वच्छ ऊर्जेवर भर :
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात भारताची विजेची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेला विशेष महत्त्व देत अणुऊर्जेच्या उत्पादनात मोठी वाढ करण्याचा संकल्प मोदी यांनी मांडला. 2047 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पुढील दशकात पाच नवीन न्यूक्लिअर रिअॅक्टर सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. फास्ट ब्रीडर न्यूक्लिअर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने महत्त्वाचा टप्पा गाठल्याचाही त्यांनी उल्लेख केला. भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा हा महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे त्यांच्या मांडणीतून दिसून आले.
कच्च्या तेलाच्या गरजेसाठी परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातही मोठे बदल करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. समुद्रातील मोठा भाग यापूर्वी ‘नो गो एरिया’ म्हणून राखून ठेवण्यात आला होता; मात्र आता समुद्रातील 99 टक्के क्षेत्र तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खननासाठी खुले करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ‘समुद्र मंथन’ (Samudra Manthan) योजनेचा उल्लेख करण्यात आला.






