Nagpur violence | नागपूर शहरातील महाल भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या दंगलीतील आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मास्टरमाईंड फहीम खान आणि अन्य आरोपींविरुद्ध BNS 152 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Nagpur violence)
हिंसाचारानंतर पोलिसांचा कठोर पवित्रा
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमुळे वातावरण तापले होते. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमधील शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या काही ओळी जाळण्यात आल्याची अफवा पसरली. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ दुपारी आंदोलन केले.
मात्र संध्याकाळी दोन्ही गट आमनेसामने आले. घोषणाबाजी, दगडफेक यामुळे नागपुरात शांतता भंग झाली आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. या दंगलमध्ये पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. यानंतर नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल, व्हिडिओ पुरावे पोलिसांकडे
नागपूर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि इतरांविरुद्ध BNS 152 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान, 172 हून अधिक व्हिडिओ पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामधून आरोपींची ओळख पटवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंच्या मदतीने पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर धरपकड केली जात आहे. (Nagpur violence)
बहुतेक आरोपी बाहेरील परिसरातील
नागपूर दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 51 आरोपींपैकी 24 जण हे महाल, भालदारपुरा, चिटणीसपार्क, हंसापुरी या प्रभावित भागाचे रहिवासी नसल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या FIR नुसार, हे आरोपी नागपूरच्या कळमना, पारडी, उमरेड रोड, वाठोडा, यशोधरा नगर, टेकनाका, जाफर नगर, बंगाली पंजा आणि ताजबाग परिसरातील आहेत.
यामुळे महाल भागातील हिंसा घडवणाऱ्यांमध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरील लोकांचा जास्त सहभाग होता, असे समोर आले आहे. पोलिस आता तपास करत आहेत की हे बाहेरचे लोक त्या भागात हिंसाचाराच्या आधीच का पोहोचले होते आणि त्यांच्या उपस्थितीमागचे उद्दिष्ट काय होते.
Title : Nagpur Violence Sedition Charges Filed Against Accused






