Nagpur violence | नागपूरमध्ये दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदाच समोर आले असून, पोलिसांनी त्यावर मोठा दावा केला आहे.
नागपूर हिंसाचारामागे कोण?
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) येथील खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरु आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ही कबर हटवावी अन्यथा बाबरीप्रमाणेच परिणाम होईल, असा इशारा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर नागपुरात मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये संघर्ष उफाळल्यानंतर शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. आता या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचे नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
फहीम खानवर गंभीर आरोप
पोलिस तपासात समोर आले आहे की, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चे शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दाखल झालेल्या तक्रारीनुसार, जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाच्या थडग्याचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, ज्याचा निषेध करण्यासाठी फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
या जमावाने शहरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यांच्याकडे कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रे होती. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून नागपुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
Title : Nagpur Violence Mastermind Exposed by Police






