Nagarparishad Elections Results | राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. दुपारपर्यंत अनेक ठिकाणचे निकाल स्पष्ट होत असताना राजकीय समीकरणांना मोठे धक्के आणि काही ठिकाणी अपेक्षित यश पाहायला मिळाले. नगरपरिषद निवडणुकांमधून (Nagarparishad Elections Results) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील स्थानिक पातळीवरील ताकद पुन्हा एकदा समोर आली आहे.
आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार काही ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने सरशी साधली आहे. तर काही नगरपरिषदांमध्ये भाजपने आपली पकड कायम ठेवत विजयी गुलाल उधळला आहे. या निकालांकडे येत्या काळातील स्थानिक राजकारणाचा आरसा म्हणून पाहिले जात आहे.
शिंदे गटाची मुसंडी :
मुखेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने विजय मिळवला असून एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणातील पहिले यश मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपरिषदेतही शिंदे गटाचा झेंडा फडकला असून १६ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मोठा धक्का बसला आहे.
विटा नगरपरिषदेत (Vita Nagarparishad) शिवसेना शिंदे पक्षाचे १७ उमेदवार आघाडीवर असून भाजपचे आठ उमेदवार पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. कराडमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव सुमारे २००० मतांनी आघाडीवर आहेत. मोहोळ नगरपरिषदेतही शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. मालवण नगरपरिषदेत मंत्री नितेश राणेंना धक्का बसत शिंदे गटाच्या ममता वराडकर नगराध्यक्ष झाल्या असून शिवसेनेने १० जागांवर विजय मिळवला आहे.
Nagarparishad Elections Results | अजित पवार गटाचं जोरदार पुनरागमन; भाजपला काही ठिकाणी यश :
लातूर जिल्ह्यातील औसा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने २३ पैकी १७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला येथे केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेस खातेही उघडू शकली नाही. जेजुरी नगरपरिषदेतही अजित पवार गटाला घवघवीत यश मिळाले असून नगराध्यक्षपदी जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. (Nagarparishad Elections Results)
शिरूर नगरपरिषदेत (Shirur Nagarparishad Election) अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी झाल्या असून भाजपसह महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मात्र आटपाडी नगरपंचायतीत भाजपने सहा जागांवर विजय मिळवत नगराध्यक्ष पद आपल्याकडे राखले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. एकूणच या निकालांतून काही ठिकाणी भाजपला झटके बसले असले तरी शिंदे-दादा गट आणि अजित पवार गट स्थानिक पातळीवर वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.






