महायुती की महाविकास आघाडी? नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व; तुमच्या शहरात कुणाचं पारडं जड?

On: December 21, 2025 11:12 AM
Local Body Election
---Advertisement---

Local Body Election | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली असून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात अनेक ठिकाणी अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. या निकालांकडे २०२९ च्या विधानसभा निवडणुकांची नांदी म्हणून पाहिले जात असल्याने प्रत्येक जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सातारा, जळगाव, नाशिक, बीड, जालना आणि पुणे विभागातील निकालांनी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी सत्ताधारी आघाड्यांनी आपली पकड मजबूत केली असली, तरी अनेक ठिकाणी अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीला दिलासा मिळतोय की महाविकास आघाडीला संधी मिळतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे, नाशिक विभागात महायुतीची सरशी :

पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपालिकेत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक २ आणि ९ मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदी जगताप यांनी पहिल्या फेरीपासूनच निर्णायक आघाडी घेतली आहे. या विजयामुळे पुणे विभागात भाजप आणि महायुतीचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यातही महायुतीची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विठ्ठलराजे उगले हे १०९८ मतांच्या आघाडीसह विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नांदगावमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होत असून पहिल्या फेरीअखेर शिंदे गटाचे सागर हिरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Local Body Election | मराठवाडा, विदर्भात चुरशीचे चित्र :

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील परतूर नगरपालिकेत भाजपने निर्णायक मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचा प्रभाव येथे दिसून आला असून भाजपच्या प्रियांका राक्षे या १३०० मतांनी आघाडीवर आहेत. परतूरमध्ये भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले असून शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. (Local Body Election Live Result)

बीड जिल्ह्यात भाजपने सहापैकी चार ठिकाणी आघाडी घेतली असली, तरी माजलगावमध्ये शरद पवार गटाने जोरदार पुनरागमन केले आहे. अंबाजोगाईत स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढणारे अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी पुढे आहेत. धरणगावमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या शहर विकास आघाडीने आघाडी घेतली असून लीलाबाई चौधरी ७५० मतांनी पुढे आहेत. (Mahayuti vs Maha Vikas Aghadi)

दरम्यान, मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील (शिंदे गट) यांनी भाजपच्या भावना महाजन यांना पिछाडीवर टाकत लक्षवेधी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. विदर्भात गोंदियामध्ये काँग्रेसचे सचिन सेंडे ३२०० मतांनी आघाडीवर असून चंद्रपूरच्या गडचांदूरमध्ये अत्यंत चुरशीची स्थिती निर्माण झाली आहे. टपाली मतदानात काँग्रेसचे सचिन भोयर आणि भाजप बंडखोर निलेश ताजने यांना समान मते मिळाल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

News Title : Maharashtra Local Body Election Results 2025: Mahayuti vs Maha Vikas Aghadi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now