Mumbai Water Cut | मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने जाहीर केले आहे की, ७ ऑक्टोबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत शहरातील काही विभागात १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पिसे आणि पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रामधील १०० किलोवॅट क्षमतेच्या विद्युत केंद्रात मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम मंगळवार, ७ ऑक्टोबर ते गुरुवार, ९ ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी १२:३० ते ३ या वेळेत केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, मुंबईतील शहर विभाग तसेच पूर्व उपनगरांतील बहुतांश भागांमध्ये पाणीकपात लागू होईल. (Mumbai Water Cut)
कोणत्या विभागात लागू होणार पाणी कपात? :
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या कालावधीत शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात पाणीकपात लागू राहणार आहे. तसेच पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एम पूर्व व एम पश्चिम विभाग, एन विभागातील विक्रोळी व घाटकोपर परिसर, एस विभागातील भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व तर टी विभागातील मुलुंड पूर्व व पश्चिम भागांमध्ये १० टक्के पाणीपुरवठा कमी केला जाणार आहे.
या कालावधीत दैनंदिन गरजा भागवताना नागरिकांना पाणी बचत करण्याचे आव्हान उभे राहणार आहे. घरगुती वापरासोबतच व्यावसायिक ठिकाणी देखील पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आधीच ह्याचे नियोजन करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचा सल्ला महानगरपालिकेकडून दिला जात आहे.
मुंबईकरांना तीन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार! :
महानगरपालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, ही कपात तात्पुरती असून पाणीपुरवठ्याची गुणवत्ता किंवा सुरक्षितता यावर कोणताही परिणाम होणार नाही. पाणीकपात केवळ मीटर बदलण्याच्या कामामुळे केली जात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. (Mumbai Water Cut)
मुंबईकरांना तीन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मात्र, ही कपात तात्पुरती असून केवळ दुरुस्ती व सुधारणा कामांमुळेच करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने केले आहे.






