पुणेकरांनो अन् मुंबईकरांनो, ट्रॅफिकची कटकट कायमची संपणार! वाचा मेगा प्लॅन

On: July 24, 2026 1:40 PM
Mumbai Pune Highway
---Advertisement---

Mumbai Pune Highway | मुंबई आणि पुणे दरम्यान वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन राज्य सरकारने जुना राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या विस्ताराची मोठी योजना आखली आहे. दोन्ही महामार्गांचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर 2030 पर्यंत या मार्गांवर एकूण 16 पदरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

जुना महामार्ग सहा पदरी करण्याची तयारी :

मुंबई-पुणे दरम्यान वाहतुकीचा ताण सातत्याने वाढत असल्याने सध्या चार पदरी असलेल्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा सहा पदरी विस्तार करण्याचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्वीकारली असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाची संपूर्ण रूपरेषा निश्चित होणार आहे. या विस्तारासाठी सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रकल्पात खंडाळा (Khandala), लोणावळा (Lonavala) आणि खोपोली (Khopoli) परिसरासाठी बायपास मार्ग उभारण्याची योजना आहे. तसेच कळंबोली (Kalamboli) ते शिळफाटा (Shilphata) दरम्यान आठ पदरी रस्ता, विविध इंटरचेंज आणि तळेगाव (Talegaon), खोपोली तसेच खालापूर (Khalapur) परिसरात 13 नवीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इंग्रजांच्या काळात सुरू झालेला जुना मुंबई-पुणे महामार्ग आज राष्ट्रीय महामार्ग 48 (NH-48) चा भाग असून तो पुढे बंगळुरू आणि चेन्नई (Chennai) पर्यंत जोडला जातो.

Mumbai Pune Highway | द्रुतगती मार्गही होणार दहा पदरी :

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचाही मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येणार आहे. सध्या सहा पदरी असलेल्या या महामार्गाचे दहा पदरीकरण करण्याची योजना एमएसआरडीसीने तयार केली असून त्यासाठी अंदाजे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील वर्षापासून या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असून चार वर्षांत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2030 पर्यंत जुना आणि नवीन असे दोन्ही महामार्ग विस्तारित स्वरूपात नागरिकांच्या सेवेत येण्याची अपेक्षा आहे.

द्रुतगती महामार्गावरील वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी यापूर्वी 1 मे रोजी महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. आता या मार्गाला कनेक्टिंग लिंक असे नाव देण्यात आले आहे. सुमारे 6,790 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात दोन आधुनिक बोगदे आणि एक केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.

याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport), पुणे रिंग रोड (Pune Ring Road), पुणे-नाशिक द्रुतगती महामार्ग (Pune-Nashik Expressway) आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग (Pune-Chhatrapati Sambhajinagar Highway) यांसारखे आगामी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून पुढील 50 वर्षांचा विचार करून अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

News Title: Mumbai-Pune Highways Set for Major Expansion

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now