वीकेंडलाही त्रासच! मुंबईकरांना आजही मेगाब्लॉकचा फटका, 344 लोकल सेवा रद्द

On: April 12, 2025 9:08 AM
Mumbai Local Update
---Advertisement---

Mumbai Local Train Update | मुंबईकरांना दररोजच्या प्रवासासाठी रेल्वे हे महत्वाचं साधन आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे दोन दिवस प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शुक्रवारी (11 एप्रिल) रात्रीपासून सुरू झालेल्या या मेगाब्लॉकमुळे 344 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शेकडो प्रवाशांना रात्री स्टेशनवरच थांबावं लागलं. (Mumbai Local Train Update)

अंधेरी ते चर्चगेटदरम्यान रेल्वे सेवा पूर्णतः बंद असल्यामुळे विरारहून निघणाऱ्या सर्व लोकल गाड्या फक्त अंधेरीपर्यंतच धावल्या. रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना ना जेवणाची सोय, ना विश्रांतीची व्यवस्था – परिणामी अनेकांना दादर स्थानकावर उपाशीपोटी झोपून काढावी लागली. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

बांद्रा-माहिम पुलासाठी मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वे मार्गावरील माहिम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला. शुक्रवार रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8:30 पर्यंत अप डाऊन धीम्या मार्गावरील सेवा बंद होती. यासोबतच जलद मार्गावरील लोकल सेवा देखील रात्री 12:30 पासून सकाळी 6:30 पर्यंत थांबवण्यात आली होती.

जलद मार्गावरील सेवा रात्री 11:30  ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद होती. त्यामुळे चर्चगेट-दादर दरम्यान जलद लोकल पूर्णपणे थांबल्या. परिणामी, डहाणू, विरार, वसई, बोरीवली येथून निघणाऱ्या लोकल गाड्या अंधेरीपर्यंतच धावू शकल्या.

प्रवाशांची सकाळीही गैरसोय, कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण

मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांची सकाळची वेळही विस्कळीत झाली. लोकल सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना बस किंवा रिक्षांच्या आश्रयाने प्रवास करावा लागला. अंधेरी स्टेशनवर गर्दीचा पूर आलेला पाहायला मिळाला. अनेक प्रवाशांनी वेळेवर ऑफिस गाठता न आल्याने नाराजी व्यक्त केली.

रेल्वे प्रशासनाकडून यावेळी कोणतीही तात्पुरती व्यवस्था केली गेली नव्हती. ना पिण्याचे पाणी, ना अन्नाची सोय, ना आरामाची जागा — या सर्व गोष्टींचा फटका सामान्य प्रवाशांना बसला. त्यामुळे सोशल मीडियावरही यासंदर्भात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.

Title: Mumbai Local Train Update 344 Trains Cancelled Due to Jumbo Mega Block 

 

Join WhatsApp Group

Join Now