IPL 2025 l आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वीच एक मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश याला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बॉश पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील पेशावर झल्मी संघाचा भाग होता, पण मुंबई इंडियन्सचा खेळाडू लिझाड विल्यम्स दुखापतीमुळे IPL 2025 मधून बाहेर पडला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्या जागी कॉर्बिन बॉशला बदली खेळाडू म्हणून संघात घेतले.
पीएसएल सोडल्याने PCB नाराज :
कॉर्बिन बॉशने IPL 2025 मध्ये खेळण्यासाठी PSL मधून माघार घेतल्याने PCB संतापली आहे. त्यांनी बॉशला व्यावसायिक कराराचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. PCB ने स्पष्ट केले की, “बॉशने पाकिस्तान सुपर लीगमधून बाहेर पडण्यामागील योग्य कारणे द्यावीत. त्याच्या या निर्णयाचे परिणाम स्पष्ट करण्यात आले असून, आम्ही त्याच्याकडून ठरलेल्या वेळेत उत्तर अपेक्षित आहोत.”
PSL फ्रँचायझीना भीती वाटते की, जर PCB ने यावर कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात अधिक परदेशी खेळाडू PSL सोडून IPL मध्ये खेळण्यास प्राधान्य देतील. PCB ने PSL चे वेळापत्रक मार्च-एप्रिलपर्यंत वाढवले होते, जेणेकरून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अधिक संधी मिळेल. मात्र, SA20, ILT20 आणि BPL सारख्या लीगमुळे अनेक खेळाडू PSL खेळण्यास इच्छुक नाहीत.
IPL 2025 आणि PSL हंगामाचे वेळापत्रक :
IPL 2025 : 22 मार्चपासून सुरू होणार, 10 संघ स्पर्धेत
PSL 2025 : 11 एप्रिल ते 25 मे दरम्यान खेळवली जाणार
कॉर्बिन बॉश प्रकरणामुळे PCB आणि BCCI दरम्यान क्रिकेट राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. IPL 2025 सुरू होण्याआधीच हा वाद क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनला आहे.






