मुंबई महापालिकेच्या एज्युकेशन बजेटमध्ये विद्यार्थ्यांना लागली लॉटरी! केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

On: February 25, 2026 12:44 PM
Maharashtra Heatwave Alert
---Advertisement---

Mumbai Education Budget | मुंबई महानगरपालिकेने (BMC) आर्थिक वर्ष 2026-27 साठी शिक्षण विभागाचा 4248.08 कोटी रुपयांचा भरीव अर्थसंकल्प जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला गती देण्यासाठी सायबर साक्षरता, POCSO कायद्याबाबत जागरूकता, ‘जादुई पिटारा’ उपक्रम, डिजिटल वर्गखोल्या आणि शैक्षणिक सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. या निर्णयांमुळे शहरातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता वृद्धी साधण्याचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

शिक्षण विभागाचा भक्कम निधी आणि प्रमुख तरतुदी :

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला. तब्बल पाच वर्षांनंतर नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत शिक्षणाचा अर्थसंकल्प (Budget 2026) मांडण्यात आला आहे. एकूण 4248.08 कोटी रुपयांच्या या तरतुदीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्यासाठी 187.57 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांसाठी 150.57 कोटी तर माध्यमिक शाळांसाठी 37 कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.

इंग्रजी भाषेतील प्रावीण्यासाठी इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी 278 इंग्रजी भाषा प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 3.87 कोटी रुपयांची तरतूद आहे. दोन शाळांमध्ये विज्ञान पार्क उभारण्यासाठी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 8 वी आणि 9 वीतील सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांना सायबर प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखला असून प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रत्येकी 11.80 कोटी रुपयांची तरतूद आहे. विज्ञान प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासाठी 10 लाख रुपये राखीव ठेवले आहेत.

तसेच सुरक्षा कायदे, POCSO कायदा आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित आणि विज्ञान सरावासाठी ‘गणित गुरुवार’ उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी 1.20 लाख रुपये दिले आहेत.

Mumbai Education Budget | पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि नव्या उपक्रमांना चालना :

2026 या वर्षात शाळांच्या नवीन इमारती उभारणे व जुन्या इमारतींची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. 57 नवीन बांधकामे पूर्ण केली जाणार असून उर्वरित 15 प्रकल्प यावर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 340 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 569 शालेय इमारतींच्या देखभालीसाठी 180.27 कोटी रुपये देण्यात आले आहेत. शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी राखीव आहे. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी प्राथमिक शाळांसाठी 23.38 कोटी तर माध्यमिक शाळांसाठी 1.08 कोटी रुपयांची तरतूद आहे.

नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बैठक व्यवस्था उभारण्यासाठी 34 कोटी 28 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. बेस्ट बसमधून मोफत प्रवासासाठी 8.70 कोटींची तरतूद आहे, तर खासगी प्राथमिक शाळांना 690 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मुंबईतील पहिल्या 25 विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च आणि ट्युशन फी महापालिका उचलणार आहे. (Mumbai Education Budget News)

तसेच ग्रंथालय अद्ययावतीकरणासाठी 5 कोटी, संगीत साहित्य खरेदीसाठी 36 कोटी, इयत्ता 3 री ते 8 वी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, ‘इको वॉरियर्स’ पर्यावरण उपक्रमासाठी 2.40 कोटी, दिव्यांग थेरपी साहित्याकरिता 10 लाख आणि सांघिक खेळांसाठी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच तीन आर्ट एक्सलन्स सेंटर स्थापन होणार असून अंधेरी पूर्व येथे नवीन सीबीएसई शाळा सुरू केली जाणार आहे.

News title : Mumbai Education Budget 2026 Key Highlights

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now