NCMC Smart Card | महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक कागदी बस पास प्रणाली बंद करून डिजिटल स्वरूपातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) लागू करण्यात येणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवास सवलतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे.
काय आहे NCMC स्मार्ट कार्ड? :
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हे प्रीपेड स्वरूपातील स्मार्ट कार्ड असून विद्यार्थ्यांना एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी याचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड केवळ एसटी बसपुरते मर्यादित नसून मेट्रो, बेस्ट बस तसेच काही रेल्वे सेवांमध्येही वापरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतूक सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, या कार्डची नोंदणी विद्यार्थ्यांच्या ‘सरल’ (SARAL) आयडीशी जोडली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि सवलतींचा गैरवापर रोखण्यास मदत मिळेल. कार्ड मिळवण्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयाकडून बोनाफाइड प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. याच कागदपत्रांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
NCMC Smart Card | शाळांमध्येच नोंदणी; 199 रुपयांत कार्ड :
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. कार्ड वितरणासाठी नियुक्त एजंट थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे बसस्थानक किंवा आगारांवर होणारी गर्दी कमी होईल आणि पास काढण्याची प्रक्रिया अधिक जलद होईल. दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पाससाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या, मात्र नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे ही समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे.
NCMC स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 199 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे कार्ड भविष्यात विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरता येणार असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात सध्या सुमारे 50 हजार विद्यार्थी एसटीच्या सवलतीच्या पाससाठी पात्र आहेत. मागील वर्षी अहिल्याबाई होळकर योजना (Ahilyabai Holkar Yojana) अंतर्गत सुमारे 29 हजार विद्यार्थिनींनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता, तर जवळपास 18 हजार विद्यार्थ्यांनी सवलतीचे पास घेतले होते. विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे (Kamlesh Dhanrale) यांनी सांगितले की, येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना पास म्हणून NCMC स्मार्ट कार्डच दिले जाणार आहे.






