Mithila Palkar | लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकरवर मोठं दुःख कोसळलं आहे. तिच्या लाडक्या आजीचं नुकतंच निधन झालं असून, या दुःखद घटनेने मिथिला पूर्णपणे भावुक झाली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना मिथिलानं सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. मिथिला सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती अनेकदा फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते.
मिथिलाची भावनिक पोस्ट :
मिथिलानं तिच्या आजीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, “मला जग समजायला आता वेळ लागेल. कारण- तिच्याशिवाय हे जग मी कधी पाहिलंच नाही. My protector, my peace, my soul. Rest well, Mumma.” या भावुक शब्दांत तिनं आजीवरील तिचं प्रेम व्यक्त केल आहे.
मिथिला लहानपणापासून दादरमधील आजी-आजोबांसोबतच राहत होती. तिचं संपूर्ण बालपण याच ठिकाणी गेलं. त्यामुळे आजीशी तिचं अतूट नातं होतं. याआधी २०२२ मध्ये तिच्या आजोबांचंही निधन झालं होतं. त्यावेळीसुद्धा मिथिलानं अशाच भावनिक शब्दांत पोस्ट शेअर केली होती. मिथिलाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
मिथिला पालकरची अभिनय कारकीर्द :
मिथिलाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. ‘मुरांबा’ या मराठी सिनेमामधील तिची ‘इंदू’ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. हिंदीत ‘लिटिल थिंग्ज’ आणि ‘गर्ल इन द सिटी’ यांसारख्या वेब सिरीजमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
मिथिलाने ‘कारवान’, ‘त्रिभंगा’, ‘चॉपस्टिक्स’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘कन्फ्युजिंग थिंग्ज गर्ल’ या युट्युब व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर ओळख मिळाली आणि त्यानंतर २०१४ मध्ये ‘माझं हनिमून’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनयात पदार्पण केलं. या दुःखाच्या प्रसंगी मिथिलाला चाहत्यांकडून आधार मिळतोय. अनेकांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला धीर दिला आहे. लाडक्या आजीच्या जाण्याने मिथिलाच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे तिच्या शब्दांतून स्पष्ट दिसतं.
View this post on Instagram






