Milind Gawali | ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून एक विचारप्रवर्तक आणि भावनिक विषय मांडला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मूळ चित्राविषयी भाष्य करत ते भारतात परत आणण्याची गरज व्यक्त केली आहे. ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.
डिलाईल रोडपासून राणीच्या बागेपर्यंतचा आठवणींचा प्रवास
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये डिलाईल रोड, लोअर परळ, लालबाग, परळ – या गिरणी कामगार भागातील त्यांचे बालपण आठवले. त्यांनी सांगितले की, ब्रिटिशांनी बांधलेल्या बीडीडी चाळींमध्ये कित्येक पिढ्या एकेक खोल्यांत वाढल्या. ब्रिटिश गेले तरी आपली घरबांधणीची शैली मात्र बदलली नाही, असे निरीक्षण त्यांनी मांडले.
मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या जंगलात आता घुसमटल्यासारखे वाटते, हेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पोस्टमध्ये मुंबईतील जिजामाता उद्यानाचा (राणीची बाग) विशेष उल्लेख होता. तिथे असलेल्या पुतळ्यांपैकी बाल शिवाजी आणि जिजामातांचा देखणा पुतळा त्यांच्या मनाला भावला, पण त्याचबरोबर अनेक ब्रिटिशांच्या पुतळ्यांचाही उल्लेख करत त्यांनी त्यावर टीका केली.
View this post on Instagram
शिवरायांचं चित्र परत आणण्याची गरज – ब्रिटिशांशी चर्चा होऊ शकते
गवळी म्हणतात, “ब्रिटिशांनी भारतातून लुटून नेलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आजही त्यांच्या देशात आहेत. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ चित्र (Original Painting) ब्रिटनमध्ये असल्याचं मी ऐकलं आहे. ते भारतात परत आणणं हे आवश्यकच आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं की, ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्याशी संपर्क करून हे चित्र परत मागवता येऊ शकते. तसेच ब्रिटिशांच्या निरुपयोगी पुतळ्यांना त्यांच्या देशात परत पाठवून त्याबदली आपल्या संस्कृतीच्या, आपल्या प्रेरणास्त्रोतांच्या मूळ वस्तू परत मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.








