MHADA Lottery 2026 | स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अवघ्या 15 लाख रुपयांपासून फ्लॅट खरेदीची संधी देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करून पात्र अर्जदारांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 521 सदनिकांची सोडत :
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात म्हाडा (MHADA) छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 521 घरांची ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही योजना प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत राबविण्यात येत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात निवासाची सुविधा देण्याचा उद्देश आहे. नक्षत्रवाडी परिसरात हा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. (MHADA Lottery 2026)
ऑनलाईन नोंदणीला 14 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली आहे. त्याच दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून अर्ज सादर करणे आणि अनामत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 मार्च 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन पेमेंट 5 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारले जाईल, तर RTGS/NEFT द्वारे बँकेत अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम वेळ संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार 5 मार्चपर्यंत असेल.
MHADA Lottery 2026 | सोडतीचे वेळापत्रक आणि उत्पन्न अट :
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 7 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर केली जाईल. त्यानंतर 7 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून 8 मार्च 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन हरकती आणि दावे नोंदवता येतील. हरकतींचा निपटारा झाल्यानंतर 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रत्यक्ष सोडत 11 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडेल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातील.
प्रधानमंत्री आवास योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. संकेत क्रमांक 266 अंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे तसेच त्यांच्या पती किंवा पत्नीचे एकत्रित वार्षिक उत्पन्न (आर्थिक वर्ष 2024-25) 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. किमान उत्पन्नाची अट मात्र लागू नाही. इच्छुकांनी www.mhada.gov.in किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी, त्यानंतर अर्ज भरून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करावे.






