Meenakshi Shinde Resigns | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता या पदावर काम करणं शक्य नसल्याचं कारण देत त्यांनी राजीनामा दिला असला, तरी या निर्णयामागे पक्षातील अंतर्गत वाद आणि नाराजी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे पुढे कोणती भूमिका घेतात आणि पक्षात नाराजी दूर करण्यासाठी काय पावलं उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निकटवर्तीयाच्या कारवाईनंतर नाराजी वाढली :
मिनाक्षी शिंदे यांच्या नाराजीमागील प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यावर करण्यात आलेली कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. भूषण भूईरे या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये, यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांचा सहभाग होता.
पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेनेत नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून, याच पार्श्वभूमीवर मिनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Meenakshi Shinde Resigns | शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर :
2017 साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने 131 पैकी 67 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्या वेळी मिनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती आणि त्या शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्या मानल्या जात होत्या. (Meenakshi Shinde Resigns)
मात्र आता त्यांच्या राजीनाम्यानंतर ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद उघडकीस आले असल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे ठाण्याचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी भाजपसोबत महायुतीतून निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने आव्हान अधिक तीव्र झालं आहे. अशा स्थितीत मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा शिंदे गटासाठी राजकीय अडचणी वाढवणारा ठरू शकतो.






