Tourist Places | पावसाळ्यात वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मावळ (Maval) तालुक्यातील अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळांवर तात्पुरती बंदी लागू केली आहे. मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय :
मुंबई (Mumbai), पुणे आणि राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधबे आणि डोंगराळ भागांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचवेळी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (Bharatiya Nagarik Suraksha Sanhita), 2023 मधील कलम 163 लागू केले आहे.
या आदेशानुसार लोणावळा (Lonavala) परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, एकविरा देवी, कार्ला लेणी आणि पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वाढती गर्दी, धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Tourist Places | नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई :
जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना बंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. धबधबे, कडे, डोंगराळ भाग आणि पाणीसाठ्यांच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा बेत आखणाऱ्या नागरिकांनी संबंधित निर्बंधांची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






