Gauri Garje Case | मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या गौरी गर्जे आत्महत्येच्या कथित प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए म्हणून कार्यरत असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांचा मृत्यू हा सुरुवातीला आत्महत्या म्हणून समजला जात होता. मात्र, या घटनेनंतर गौरी (Gauri Garje Case) यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी धक्कादायक आरोप करत प्रकरण पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेले आहे. त्यांचा ठाम दावा आहे की गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपी अनंत गर्जे (Anant garje) याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक अहवालातून नव्या आणि खळबळजनक माहितीनं प्रकरणात अनपेक्षित वळण आलं आहे. प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे पुरावे आढळून आल्याने हे प्रकरण साधे आत्महत्येचे नसून यात काहीतरी गंभीर संशय असल्याचे संकेत अधिक बळावले आहेत.
प्राथमिक अहवालात जखमा आढळल्या; पोलिसांचा मोठा दावा :
न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, गौरी गर्जे यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे मृत्यूच्या आधी काही प्रकारची धक्काबुक्की किंवा संघर्ष झाल्याचा पोलिसांना संशय आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी अनंत गर्जे यांच्या शरीरावरही काही जखमा असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्येपेक्षा हत्येच्या दिशेने तपासण्याची गरज असल्याचे संकेत दिले आहेत.
याशिवाय, या दोघांमधील संभाषण, कॉल रेकॉर्ड्स आणि मोबाईल डेटा पोलिसांना संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी कोर्टाला स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सर्व डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, फोन लोकेशन्स आणि वैयक्तिक संवादांची तपशीलवार पडताळणी सुरू आहे. मृत्यूच्या आधी नक्की काय घडले? त्या क्षणी घरात कोण होते? कोणत्या परिस्थितीत गौरीचा मृत्यू झाला? हे महत्त्वाचे प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
Gauri Garje Case | अनंत गर्जेची पोलीस कोठडी वाढवली; तपासाला वेग :
या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपी अनंत गर्जेची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती. तपासातील महत्वाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि आरोपीची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कोर्टानेही हा युक्तिवाद मान्य करत अनंत गर्जेची पोलीस कोठडी २ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. (Gauri Garje Case)
कोठडीत वाढ झाल्याने आता पोलिसांकडे तपास पुढे नेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. विशेषतः कॉल रेकॉर्ड्स, जखमांचे स्वरूप, मृत्यूच्या आधीची हालचाल, तसेच घरातील परिस्थिती याचा तपास गतीने सुरू राहणार आहे. दोन्ही कुटुंबांच्या विधानांमधील विसंगती, मृत्यूच्या आधीचे वाद, आणि घरातील परिस्थिती यावरही पोलिसांची नजर आहे.






