Shivaji Maharaj Movie | महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत रसिकांच्या उत्सुकतेला चालना दिली आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ (Punha Shivajiraje Bhosale) असे या चित्रपटाचे नाव असून, यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ‘दृश्यम 2’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके (Sidharth bodake) झळकणार आहे. या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रातील शिवप्रेमी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा उलगडताना सांगितले की, “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो. म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे.” ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा केवळ ऐतिहासिक चित्रपट न राहता आधुनिक महाराष्ट्राला आपल्या मूळ विचारांकडे परत नेणारा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजप्रबोधनाचाही ध्यास :
“हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. यांच्या भावनांशी खेळलात, तर गाठ माझ्याशी आहे,” अशा ठाम संवादातून चित्रपटाचा उद्देश स्पष्ट होतो. आजच्या काळातील निष्क्रियता, सामाजिक उदासीनता आणि प्रश्नांवरील मौन अशा अनेक मुद्यांना हा चित्रपट शिवरायांच्या विचारांद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. बालकलाकार त्रिशा ठोसरदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Punha Shivajiraje Bhosale Movie)
चित्रपटाचं लेखन अंतिम टप्प्यात असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं असून निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांची आहे.
Shivaji Maharaj Movie | सामाजिक वास्तवाशी साधणार संवाद :
चित्रपटात नेमकं कोणतं सामाजिक किंवा राजकीय वास्तव हाताळण्यात येणार, याविषयी अद्याप तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, दिग्दर्शक मांजरेकर यांनी स्पष्ट केलं की, हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक भान जागवणारा असेल.
सिद्धार्थ बोडके (Sidharth Bodake) यांनी आपल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ही केवळ भूमिका नाही, तर एक जबाबदारी आहे. याआधी अनेक दिग्गज कलाकारांनी महाराजांची भूमिका साकारली आहे. आता ती जबाबदारी माझ्यावर आहे, आणि मी ती योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय.”








