Devendra Fadnavis | भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी विकास आराखडा मांडला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आगामी काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी गुंतवणूक, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्धार केला.
ध्वजारोहणानंतर बोलताना त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत लोकशाही मूल्यांमुळेच महाराष्ट्र सातत्याने प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे नमूद केले. 26 जानेवारी 1950 रोजी अंगीकारलेल्या संविधानामुळे देशाला मजबूत लोकशाही व्यवस्था मिळाली असून त्याच आधारावर राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकास गंगेचे नवे पर्व :
फडणवीस यांनी नुकत्याच दावोस परिषदेत महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करार झाल्याचा उल्लेख केला. या गुंतवणुकीचा लाभ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि कोकण अशा सर्व भागांना होणार असून राज्यभर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी, आदिवासी, अनुसूचित जाती तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत दुष्काळमुक्त महाराष्ट्र, नदी जोड प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या योजनांमुळे पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Devendra Fadnavis | ‘सामान्यांच्या राज्याचा’ संकल्प – एकनाथ शिंदे :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याच्या विकासाचा नवा संकल्प मांडला. ‘आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत,’ असे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Maharashtra Development Plan)
ठाण्यात 260 मीटर उंचीचा जागतिक दर्जाचा व्ह्यूइंग टॉवर उभारण्यात येणार असून तो शहराची नवी जागतिक ओळख ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. झोपडपट्टीमुक्त शहरे, मेट्रोचे जाळे आणि मूलभूत सुविधांचा विस्तार यामुळे महाराष्ट्र गतीशील राहील आणि देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.






