Mumbai Water Cut | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिमच्या दुरुस्तीमुळे येत्या २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच ठाणे आणि भिवंडी भागात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या काळात मुंबईतील अनेक भागांत १० टक्के, तर ठाण्यात २० टक्के पाणी कमी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
पिसे येथील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या न्यूमॅटिक गेट सिस्टिमच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दरवर्षी अनिवार्य असते. या कामामुळे पाणी उपसा मर्यादित करावा लागतो. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होणार असून, पुढील १२ दिवस नागरिकांना कमी दाबाने किंवा ठराविक वेळेतच पाणी मिळण्याची शक्यता आहे. (Mumbai Water Cut News)
१० टक्के पाणीकपात लागू :
दक्षिण मुंबईतील ‘ए’ विभागातील नेव्हल डॉकयार्ड परिसर तसेच ‘बी’ विभागातील मोहम्मद अली मार्ग, डोंगरी भागांत पाणी कमी दाबाने येईल. मध्य मुंबईतील ‘सी’ विभागातील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला तसेच ‘ई’ विभागातील भायखळा, मदनपुरा, आग्रीपाडा, चिंचपोकळी आणि रे रोड परिसरातही पाणीकपात जाणवणार आहे. परळ, लालबाग, हिंदमाता, माटुंगा, शीव आणि वडाळा या भागांतही नागरिकांना पाणी कमी प्रमाणात मिळेल.
पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसेच कुर्ला पूर्व, मानखुर्द, गोवंडी, देवनार, चेंबूर आणि टिळकनगर भागांत पाण्याचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी साधारण १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. (water supply reduction)
Mumbai Water Cut | ठाणे शहरात २० टक्के पाणीकपात होणार :
मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दुरुस्तीमुळे ठाणे शहरात थेट २० टक्के पाणीकपात होणार आहे. परिणामी अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी कमी दाबाने येईल किंवा ठराविक वेळेतच उपलब्ध राहील. भिवंडीतील काही भागांनाही या कपातीचा परिणाम सहन करावा लागणार आहे. (Mumbai Water Cut News)
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या काळात पाणी साठवून ठेवावे, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा. दुरुस्तीचे काम ७ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, ८ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल. मात्र सुरुवातीचे एक-दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






