Maharashtra Weather Update | पुणे (Pune) शहर आणि लगतच्या परिसराला बुधवारी दुपारी अवेळी आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळच्या असह्य उकाड्यानंतर अचानक गारा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या या जलधारांमुळे नागरिकांना मोठा गारवा मिळाला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) गुरुवारी, २ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) गारपिटीचा आणि वादळी वाऱ्याचा गंभीर इशारा दिला आहे.
बुधवारच्या या पावसात प्रामुख्याने सिंहगड रस्ता (Sinhagad Road), धनकवडी (Dhankawadi), कात्रज (Katraj), तसेच हडपसर (Hadapsar), लोहगाव (Lohgaon) आणि खराडी (Kharadi) या परिसरांना गारांच्या पावसाचा मोठा तडाखा बसला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २ एप्रिल रोजी राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार हवामानाचा अनुभव येऊ शकतो. विशेषतः मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी प्रशासनाने ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. याशिवाय, संपूर्ण राज्यात ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सध्या उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांवरून असे स्पष्ट होते की, मुंबई (Mumbai) आणि पुणे विभागावर ढगांची दाटी मोठ्या प्रमाणावर होत आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारताकडून हे ढग आता वेगाने दक्षिणेच्या दिशेने मार्गक्रमण करत असून, त्याचा सर्वाधिक फटका पश्चिम भारताला बसणार आहे. यामुळे डोंगराळ पट्ट्यात आणि शहरांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. कल्याण-बदलापूर (Kalyan-Badlapur), ठाणे (Thane) आणि मुंबईत पावसाची शक्यता कमी असली तरी, लोणावळा (Lonavala) आणि पुण्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सलग पडणाऱ्या या पावसामुळे उन्हाळ्याच्या तीव्रतेत मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यात ४० अंशांपर्यंत पोहोचलेला तापमानाचा पारा आता ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. तापमानाच्या नोंदी पाहता, बुधवारी अमरावती (Amravati) जिल्ह्यात राज्यातील सर्वात जास्त म्हणजेच ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दुसऱ्या बाजूला, निफाड (Niphad) येथे पारा कमालीचा घसरला असून तिथे १७.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Thunderstorm accompanied with lightning , hail, light to moderate rain, gusty winds with speed 50-60 kmph very likely to occur at isolated places in the districts of Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 1, 2026
पुणे जिल्हा आणि शहराच्या हवामानात मात्र आगामी दोन दिवसांत कमाल तसेच किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारच्या वेळेत आकाशात ढग दाटून येतील आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणातील हे अचानक होणारे बदल आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन, हवामानशास्त्र विभागाने पुणे शहर तसेच जिल्ह्यासाठी अधिकृतपणे ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.






