Rain Alert | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला होता. मात्र आज, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. मुंबईसह बहुतांश भागांत मुसळधार पावसापासून उसंत मिळाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तरीही हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबई आणि कोकणाला यलो अलर्ट :
मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. उत्तर कोकणात पावसाचा जोर अधूनमधून वाढण्याचा अंदाज आहे, तर दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. नागरिकांना प्रवास करताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-कोकणापेक्षा पुणे घाटमाथ्यावर पावसाचा धोका अधिक असल्याने हवामान विभागाने या भागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून, रस्ते प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरडी कोसळणे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे होणारा अडथळा टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.
Rain Alert | मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राला दिलासा :
गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने त्रस्त असलेल्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र आज पावसाचा जोर ओसरला आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतीसाठी हा पाऊस योग्य ठरण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उद्यापासून पुढील तीन दिवसांत पुन्हा काही भागांत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषत: रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या हालचालींवर लक्ष ठेवून सतर्क राहणे आवश्यक आहे.






