Maharashtra Weather | भारतीय हवामान विभागाने (IMD) 20 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजात राज्यातील विविध भागांत हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाचा अंदाज देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह कोकणात हवामानाचा इशारा
या अंदाजानंतर मुंबई (Mumbai) येथील मंत्रालयातूनही तातडीचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांत मुंबई, उपनगर, पालघर (Palghar), रायगड (Raigad) आणि ठाणे (Thane) जिल्ह्यांतील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, यवतमाळ (Yavatmal) येथे दिवसभर ढगाळ वातावरणानंतर रात्री अचानक हवामानात बदल झाला. जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने अनेक भागांना झोडपले. या बदलामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तसेच आंबा आणि उन्हाळी तीळ पिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परभणीतील पावसाचा फटका आणि प्रशासनाची तयारी
परभणी (Parbhani) जिल्ह्यात दिवसभरच्या उष्णतेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात गारवा निर्माण झाला. मात्र, या वाऱ्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामीण भागातील शेतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सततच्या वादळी पावसामुळे गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाले असून पुढील उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी विजांचा कडकडाट ऐकू येताच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांना जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले असून शेतकऱ्यांनी या काळात शेतीकाम टाळावे, तसेच मोठ्या गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
News Title: Maharashtra Weather Forecast Rain and Hailstorm Alert






