Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस हवामान अधिक बिघडण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 3 ते 5 एप्रिलदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अचानक हवामान बदल होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मका, गहू, बाजरी तसेच आंबा आणि इतर फळबागांचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (Nahsik), धुळे (Dhule) आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या भागांतही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच हिंगोली, बीड, परभणी, अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि जळगाव या भागांत गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे, मुंबई, ठाणे आणि पालघर या शहरांमध्ये उकाड्यासह ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Maharashtra Weather Alert | हवामान बदलामागील कारण :
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राजस्थान परिसरात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आणि उत्तर भारतातील सक्रिय ट्रफ लाईनमुळे अरबी समुद्रातील आर्द्रता महाराष्ट्राकडे खेचली जात आहे. त्याचबरोबर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे वातावरणात अचानक बदल होऊन पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
या परिस्थितीमुळे राज्यातील अनेक भागांत 30 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून काही ठिकाणी गारपीट आणि विजांचा कडकडाट होत आहे. पुण्यात गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळण्याची घटना घडली असून कोंढवा परिसरात वाहनांवर झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमधील काही अंडरपासमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. (Maharashtra Weather Alert)
हवामान विभागाने सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला असला तरी त्यानंतर उकाडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






