Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आता काही प्रमाणात सुधारणा होत असली, तरी नव्या स्वरूपात उष्णतेचा धोका वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिलपासून राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी हलक्या सरींसह वादळी पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागात तापमानात झपाट्याने वाढ होत असून पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते. अवकाळी पावसामुळे मागील महिनाभर राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी हवामानातील अचानक बदलामुळे नव्या संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत.
विदर्भात वादळी पावसाचा इशारा :
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास विशेषतः विदर्भासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Alert)
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतही विजांसह हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Alert | राज्यात वाढते तापमान; उष्णतेची लाट येण्याची शक्यता :
एकीकडे पावसाचा प्रभाव कमी होत असताना दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. मुंबई आणि कोकण भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज असून काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या संकटातून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र तापमान झपाट्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 32 ते 34 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात ते 37 ते 39 अंशांपर्यंत जाऊ शकते. (Maharashtra Weather Today)
मराठवाडा आणि विदर्भात तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत राहू शकतो. त्यामुळे विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम शेतकरी, कामगार, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांवर होऊ शकतो.






