SSC Result | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 29.53 टक्के लागला असून, परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी 15 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. निकालासोबत गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
निकालाची आकडेवारी आणि विभागनिहाय कामगिरी :
दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेसाठी 52 हजार 880 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 51 हजार 313 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल 29.53 टक्के इतका नोंदवण्यात आला. मागील वर्षी पुरवणी परीक्षेचा निकाल 36.48 टक्के होता. त्या तुलनेत यंदा निकालात 6.96 टक्क्यांची घट झाली आहे.
विभागनिहाय निकालात नाशिक विभागाने 41.45 टक्के निकालासह प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर नागपूरचा 39.42 टक्के, लातूरचा 34.55 टक्के आणि छत्रपती संभाजीनगरचा 34.27 टक्के निकाल लागला. अमरावती विभागाचा निकाल 30.36 टक्के राहिला, तर पुणे 23.99, कोल्हापूर 18.53, मुंबई 17.73 आणि कोकण विभाग 12.26 टक्क्यांसह अनुक्रमे पुढील स्थानांवर राहिले.
SSC Result | एटीकेटीची सुविधा आणि पुढील प्रक्रिया :
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी निकाल जाहीर केला. परीक्षेत मुलींची कामगिरी मुलांपेक्षा सरस ठरली. एकूण 10 हजार 224 मुले आणि 4 हजार 933 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 27.75 असून मुलींचा निकाल 34.60 टक्के इतका नोंदवण्यात आला.
दरम्यान, एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण ठरलेल्या 18 हजार 482 विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. तसेच निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्जही करू शकणार आहेत.






